अहमदाबाद, 26 मे : आयपीएल 2023 च्या दुसऱ्या प्ले-ऑफमध्ये गुजरातच्या शुभमन गिलने मुंबईच्या बॉलिंगची पिसं काढली. गिलने 60 बॉलमध्ये 215 च्या स्ट्राईक रेटने 129 रनची खेळी केली, यामध्ये 10 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता, पण शुभमन गिलला या सामन्यामध्ये जीवनदान मिळालं, ज्याचा मोठा फटका मुंबईला बसला. मुंबईच्या टीम डेव्हिडने शुभमन गिलचा कॅच सोडला, हा कॅच सुटला तेव्हा गिल 20 बॉलमध्ये 30 रनवर खेळत होता. पॉवर प्ले च्या शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजेच सहाव्या ओव्हरला क्रिस जॉर्डन बॉलिंग करत होता. पाचव्या बॉलला गिलने मिड ऑनच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण डेविडने कॅच सोडला. टीम डेविडला मुंबईने आयपीएल लिलावामध्ये 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
डेविडची निराशाजनक कामगिरी
याआधी लीग स्टेजमध्येही लखनऊ आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यामध्ये टीम डेव्हिडच्या शेवटच्या ओव्हरमधल्या चुकांमुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. लखनऊविरुद्धच्या सामन्यात मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 रनची गरज होती, तेव्हा कॅमरून ग्रीन आणि टीम डेविड स्ट्राईकवर होते, पण दोघांनाही मोहसिन खानच्या बॉलिंगवर फक्त 5 रन करता आल्या, त्यामुळे मुंबईचा 5 रनने पराभव झाला.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 रनची गरज होती. अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर डेविडने पहिल्याच बॉलला एक रन घेतली. यानंतर अर्शदीपने दोन विकेट घेतल्या आणि टीम डेविडला स्ट्राईकच मिळाला नाही. शेवटच्या ओव्हरला 16 रनची आवश्यकता असताना डेविडकडून मोठे शॉट खेळण्यासाठी स्वत:कडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं, पण त्याने पहिल्याच बॉलला एक रन काढून स्ट्राईक बदलला.
लखनऊ किंवा पंजाबविरुद्धच्या एका सामन्यात विजय झाला असता तर मुंबईच्या खात्यात 18 पॉईंट्स झाले असते आणि पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईला दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची संधी मिळाली असती. आयपीएल प्ले-ऑफमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्यास टीमला फायनलमध्ये जायच्या दोन संधीही मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, Mumbai Indians