मुंबई, 13 मे : आयपीएल 2023 मध्ये 59 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात पंजाबने दिल्लीचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला असून आयपीएल 2023 मधील 6 वा विजय आपल्या नावे केला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी फलंदाजीसाठी पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात उतरली. पंजाबकडून प्रभसिमरन सिंहने 103, सॅम करनने 20 तर सिकंदर रझाने 11 धावा केल्या परंतु पंजाबच्या इतर कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पंजाबच्या 7 विकेट्स घेतल्या. यात इशांत शर्माने 2, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 167 धावा करून दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 54 धावांची वादळी खेळी केली. तर वॉर्नर वगळता दिल्लीकडून फिलिप सॉल्टने 21, अमन हकीम खानने 16, प्रवीण दुबेने 16, कुलदीप यादवने 10 धावांची खेळी केली. परंतु दिल्लीचा संघ विजयाचे आव्हान पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे अखेर पंजाब किंग्सचा 31 धावांनी विजय झाला.