नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : आगामी इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलसाठी (IPL) चेन्नईत नुकताच एक मिनी लिलाव पार पडला. यामध्ये आठही संघानी हवे असलेले खेळाडू घेण्यासाठी मोठी किंमत मोजली. यामध्ये अनेक खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) अनेक खेळाडूंवर बोली लावली, परंतु त्यांच्याकडे आवश्यक रक्कम नसल्यानं त्यांना हवे ते खेळाडू खरेदी करता आले नाहीत. या लिलावानंतर या संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा बॅटसमन डेव्हिड वॉर्नर (David Warner) यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत, आपल्या संघासाठी आणि चाहत्यासाठी एक संदेश शेअर केला आहे.
या फोटोत तो टीमला लीड करताना दिसत असून, एका अविश्वसनीय संघाचा प्रमुख म्हणून टीममधील खेळाडू, स्टाफ आणि चाहते यांचं नेतृत्व करणं ही त्याच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे, असं त्यानं आपल्या संदेशात म्हटलं आहे. या संघाला एक उत्तम समूह म्हटलं असून, आगामी मोसमासाठी आपण उत्सुक असल्याचं देखील म्हटलं आहे. वॉर्नरनं हा फोटो आणि संदेश शेअर केल्यापासून त्याला चाहत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चार लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादनेदेखील ‘लव्ह यू 3000’ अशी कमेंट केली असून, त्यावर वॉर्नरनं हार्टच्या इमोजीने उत्तर दिलं आहे.
Just to clarify a comment I made on commentary last night, that “My Groin”will need on going treatment and will have an annoying pain for at least 6-9 months. I am returning to play for NSW on the 4th March 2021 #horsesmouth
— David Warner (@davidwarner31) February 23, 2021
View this post on Instagram
त्याच्या या पोस्टमुळे आगामी हंगामात तो खेळणार असल्याचं नक्की झाल्यानं सनरायजर्सच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी दुखापत झाल्यानं वॉर्नर या हंगामात खेळणार नसल्याची अफवा लिलावाआधी पसरली होती, मात्र दुखापत बरी होणार असल्यानं आपण खेळणार असल्याचं त्यानं ट्वीटर संदेशाद्वारे कळवलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्येही पुनरागमन करत तो न्यू साऊथ वेल्ससाठी आणि मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील स्थानिक वनडे मालिकेत खेळणार असल्याचं त्यानं जाहीर केलं आहे.
वॉर्नर 2009 पासून आयपीएलमध्ये खेळतो आहे. 2009 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सनं (Delhi Daredevils) खरेदी केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये त्याला सनरायजर्स हैदराबादनं खरेदी केलं आणि एका वर्षांनंतर त्याला संघाचा कॅप्टन केलं. त्यानंतर या संघाचं नशीब पालटलं. वॉर्नरनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 2015, 2017 आणि 2019 मध्ये ऑरेंज कॅप जिंकली असून, 2016 मध्ये संघाला विजेतेपददेखील मिळवून दिलं आहे. आयपीएलमध्ये 5000 पेक्षा जास्त रन्स करणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, David warner, Delhi daredevils, India vs england, Instagram, IPL 2021, Sunrisers hyderabad