मुंबई, 6 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) 14व्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे, पण त्याआधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे (Wankhede Stadium) आणखी 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus) आढळले आहेत. यातले दोन कर्मचारी ग्राऊंड स्टाफमधले तर एक जण प्लंबर आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काहीच दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमच्या 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आणि आयपीएलचं सुरक्षित आयोजन करण्यासाठी आता वानखेडे स्टेडियमचे कर्मचारी घरी न जाता स्टेडियममध्येच राहतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे स्टेडियमच्या आत एक क्लब हाऊस आहे. तिकडेच आयपीएलचे सामने संपेपर्यंत कर्मचारी राहतील.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतल्या मॅचवर संकट ओढावलं होतं. पण राज्य सरकारने आता आयपीएलला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
आयपीएल मॅचसाठी टीमना सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. आयपीएलच्या टीमना दोन सत्रात सराव करता येणार आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 आणि संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीमध्ये टीमना आणि स्टाफना मैदानात सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये टीम हॉटेल ते मैदान असा प्रवास करू शकतील.
9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबईमध्ये यावर्षी आयपीएलचे 10 सामने होणार आहेत. मुंबईमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान 10 मॅच होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या चार टीमचे सामने मुंबईमध्ये होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, IPL 2021, Wankhede stadium