मुंबई, 7 जून : कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 29 सामन्यांनंतर आयपीएल स्थगित करण्यात आली. यानंतर आता उरलेले 31 सामने युएईमध्ये (UAE) होतील. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उरलेले सामने सुरू होतील, तर फायनल दसऱ्याच्या मुहुर्तावर 15 ऑक्टोबरला खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे 2020 सालच्या आयपीएलचे सगळे 60 सामने युएईमध्ये खेळवले गेले होते.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय (BCCI) अधिकारी म्हणाले, 'आयपीएल पूर्ण करण्यासाठी आम्हाला 25 दिवसांची गरज आहे. युएई बोर्डासोबतची बैठक चांगली झाली. ते आयपीएलचं आयोजन करण्यासाठी तयार आहेत. 19 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे सामने शारजाह, दुबई आणि अबुधाबीमध्ये होतील.'
आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत साशंकता आहे, पण आम्ही त्यांच्या बोर्डाशी बोलत आहोत. त्यांच्याकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं.
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये सध्या दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं नाही, तर बोर्डाला 2500 रुपयांचं नुकसान होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आधीच सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, IPL 2021, UAE