अहमदाबाद, 27 एप्रिल : आयपीएल इतिहासात (IPL) पहिल्यांदाच एका वेगळ्याच कारणामुळे सामना थांबल्याची घटना घडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यातल्या सामन्यातली पहिली इनिंग संपल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) वाळूचं वादळ आलं, त्यामुळे दुसरी इनिंग सुरू व्हायला उशीर झाला. दिल्लीचे ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात बॅटिंगसाठी येत होते, पण या वाळूच्या वादळामुळे त्यांना पुन्हा डग आऊटमध्ये जावं लागलं.
A run chase after a sandstorm.
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 27, 2021
Is there a Playlist for that? 👀#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCvRCB pic.twitter.com/MZY7lAQdXG
त्याआधी एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) एकाकी झुंजार खेळीनंतर बँगलोरने दिल्लीला (RCB vs DC) विजयासाठी 172 रनचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बँगलोरला बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी बँगलोरला फार चांगली सुरुवात करुन दिली नाही. विराट 12 रनवर आणि पडिक्कल 17 रनवर आऊट झाले. सुरुवातीच्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि ग्लेन मॅक्सेवल (Glenn Maxwell) यांनी बँगलोरचा डाव सावरायला मदत केली, पण पाटीदार 31 आणि मॅक्सवेल 25 रनवर आऊट झाले, यानंतर एबी डिव्हिलियर्सने सगळी सूत्र स्वत:च्या हातात घेतली. एबीने 42 बॉलमध्ये नाबाद 75 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. दिल्लीकडून इशांत शर्मा, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा, अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम दुसऱ्या आणि बँगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही टीमनी 5 पैकी 4 सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. नेट रनरेटमुळे दिल्ली बँगलोरपेक्षा वरचढ आहे.