Home /News /sport /

IPL 2021 : क्रिकेटसाठी बूक स्टॉलवर नोकरी, लिलावात झाला कोट्यधीश, आता आयपीएलमध्ये पदार्पण

IPL 2021 : क्रिकेटसाठी बूक स्टॉलवर नोकरी, लिलावात झाला कोट्यधीश, आता आयपीएलमध्ये पदार्पण

आयपीएलमुळे (IPL 2021) हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगणाऱ्या खेळाडूंना कोट्यधीश बनवण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली आहे. क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सौराष्ट्रच्या चेतन सकारियालाही (Chetan Sakariya) याचा अनुभव आला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 एप्रिल : आयपीएलमुळे (IPL 2021) हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगणाऱ्या खेळाडूंना कोट्यधीश बनवण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली आहे. क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सौराष्ट्रच्या चेतन सकारियालाही (Chetan Sakariya) याचा अनुभव आला. पंजाबविरुद्धच्या मॅचमधून (Rajasthan Royals vs Punjab Kings) सकारियाने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. आयपीएलच्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने 1.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यंदाच्या मोसमात एखाद्या अनकॅप खेळाडूवर लागलेली ही दुसरी सगळ्यात मोठी बोली होती. जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यापर्यंतच्या सकारियाच्या प्रवासात अनेक अडथळे आले. 22 वर्षांचा डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या सकारियाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडील टेम्पो ड्रायव्हरची नोकरी करत होते. घरात आर्थिक चणचण असताना क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करणं शक्यच नव्हतं, म्हणून त्याने बूक स्टॉलवर दोन वर्ष रोजंदारीवर काम केलं. सकारियाचा आयडल युवराज सिंग (Yuvraj Singh) 2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून देत होता, पण हा इतिहास बघण्यासाठी त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता. युवराजप्रमाणेच आपणही बॅट्समन व्हावं, असं सकारियाला वाटत होतं, पण भावनगरमधले प्रशिक्षक राजेंद्र गोयल (Rajendra Goyal) यांनी त्याचा वेग बघून सकारियाला फास्ट बॉलर व्हायचा सल्ला दिला. झहीर खान (Zaheer Khan), जुनैद खान (Junaid Khan) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यांची बॉलिंग चेतन कौतुकानं बघायला लागला. बॅट्समन होण्यासाठी बॅट, पॅड, हेल्मेट यांच्यासारख्या महागड्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात, पण बॉलर होण्यासाठीचा खर्च कमी असतो, त्यामुळे गोयल सरांच्या सल्ला माझ्या पथ्यावर पडला, असं सकारिया सांगतो. 'लहान असताना मला स्पाईक्स असलेले बूट विकत घेण्यासाठीचेही पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वरिष्ठांनी मा मदत केली. खालच्या क्रमांकावर बॅटिंग करत असल्यामुळे मी बॅट्समनची बॅट घेऊन खेळायला जायचो. शेल्डन जॅकसनचा नाईकीसोबत करार होता, तसंच त्याचा आणि माझा बुटाचा नंबरही सारखाच होता, त्यामुळे तो मला त्याच्याकडचे बूट द्यायचा,' असं सकारिया क्रिकबझशी बोलताना म्हणाला. 2017 साली शेल्डन जॅकसन आणि शितांशू कोटक यांनी सकारियाला सौराष्ट्रच्या रणजी टीममध्ये जागा दिली. पहिल्या मोसमात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्याला एमआरएफ पेस अकादमीमध्ये ग्लेन मॅकग्राथकडे (Glenn McGrath) प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. याचा सकारियाला चांगलाच फायदा झाला. या वर्षाच्या सुरूवातीलाच सकारिया सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali T-20 Trophy) खेळत होता, तेव्हाच त्याच्या भावाने गुजरातच्या भावनगरमध्ये आत्महत्या केली. सकारियाच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ नये, म्हणून त्याच्यापासून ही घटना लपवून ठेवण्यात आली होती. घरातल्या परिस्थितीची अजिबात कल्पना नसलेल्या सकारियाने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतला तो सर्वाधिक विकेट घेणारा सहाव्या क्रमांकाचा बॉलर ठरला. आयपीएलचा मोठ्या रकमेचा चेक मिळाल्यानंतर राजकोटमध्ये चांगलं घर घ्यायचं सकारियाने ठरवलं आहे. कुटुंब आणि माझ्या बहिणीला चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी मी घर घेणार आहे, असं सकारिया म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Ipl 2021 auction, Rajasthan Royals

    पुढील बातम्या