मुंबई, 30 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला संघर्ष करावा लागला आहे. सर्वाधिक पाचवेळा आयपीएल ट्रॉफी पटकावणाऱ्या मुंबईला त्यांच्या नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचणं मुंबईसाठी कठीण होऊन बसलं आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 6 विकेटने विजय झाला, ज्यामुळे त्यांच्या खात्यात 2 पॉईंट्स जमा झाले. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पाचव्या आणि कोलकाता (KKR) चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमनी 11 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. कोलकात्याच्या नेट रन रेट मुंबईपेक्षा चांगला असल्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
प्ले-ऑफचं गणित काय?
मुंबई आणि कोलकात्याचे या मोसमातले आणखी 3 सामने शिल्लक आहेत. कोलकात्याची टीम पंजाब, हैदराबाद (SRH) आणि राजस्थानविरुद्ध (Rajasthan Royals) खेळणार आहे, तर मुंबईचे सामने दिल्ली, राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध होणार आहेत.
या परिस्थितीमध्ये मुंबईची अपेक्षा पंजाब, हैदराबाद किंवा राजस्थानने कोलकात्याचा पराभव करावा अशीच असेल, ज्यामुळे प्ले-ऑफचे दरवाजे मुंबई इंडियन्ससाठी उघडू शकतात. या गोष्टी मुंबईच्या हातात नसल्या तरी आपले उरलेले तिन्ही सामने जिंकूनही मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहोचता येईल. दुसरीकडे कोलकात्याने उरलेल्या तीनपैकी एकही सामना गमावला नाही, तर मात्र मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगू शकतं.
मुंबईचं काय चुकतंय?
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगने या मोसमात त्यांची निराशा केली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी आयपीएलच्या मागच्या मोसमात धमाका केला, पण यंदा मात्र हे दोघंही खराब फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमार यादवने 11 इनिंगमध्ये 189 रन केले, तर इशान किशनला 8 सामन्यांमध्ये फक्त 107 रन करता आले. रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू असला तरी त्याला जास्तच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करता आलेली नाही. याशिवाय पांड्या बंधूदेखील संघर्ष करत असल्यामुळे टीमची संपूर्ण जबाबदारी पोलार्डवरच येत आहे.
एकीकडे बॅटिंग संघर्ष करत असताना टीमचे स्पिनरही अपयशी ठरत आहेत. लेग स्पिनर राहुल चहरने (Rahul Chahar) 11 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या, पण त्याला कृणाल पांड्याकडून (Krunal Pandya) म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही. हार्दिक पांड्यादेखील (Hardik Pandya) बॉलिंग करत नसल्यामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians