मुंबई, 12 एप्रिल : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2021) अनेक नवोदितांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. यातल्या अनेकांची नावं बहुतेकवेळा क्रिकेट रसिकांनी ऐकलेलीही नसतात. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) त्यातलाच एक. पंजाब किंग्सच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स अनिल कुंबळे (Anil Kumble) याने तर शाहरुखची तुलना जगातल्या सर्वोत्तम टी-20 खेळाडू असलेल्या कायरन पोलार्डशी (Kieron Pollard) केली होती. शाहरुखकडे बघून आपल्याला कायरन पोलार्डची आठवण येते, असं कुंबळे म्हणाला. आता राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात शाहरुख खानला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये शाहरुखने एकही अर्धशतक केलेलं नाही. शाहरुख खान स्थानिक क्रिकेट तामीळनाडूकडून खेळतो. 20 लाखांची बेस प्राईज असलेल्या शाहरुख खानला पंजाबने 20 पट जास्त रक्कम देऊन 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. शाहरुखला विकत घेण्यासाठी पंजाब, दिल्ली आणि बँगलोर यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. पंजाबच्या टीमने लिलावात विकत घेतल्यानंतरही शाहरुख खूश झाला होता. ‘लिलाव 3 वाजता सुरू झाला तेव्हा मी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव करत होतो. लिलावात जेव्हा माझं नाव येईल तेव्हा मला सांग, असं मी फिजियोला सांगितलं होतं. पण सराव करत असताना माझं नाव आलं नाही. सराव संपवून मी बसने हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा लिलावात माझं नाव पुकारलं गेलं आणि माझ्या छातीत धडधडायला लागलं,’ असं शाहरुख म्हणाला होता. तामीळनाडू प्रीमियर लीगमधल्या चांगल्या कामगिरीनंतरच शाहरुखवर आयपीएल फ्रॅन्चायजींची नजर होती. शाहरुखने 31 टी-20 मॅचमध्ये 131 च्या स्ट्राईक रेटने 293 रन केले. बॅटिंगसोबतच शाहरुख ऑफ स्पिन बॉलिंगही करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.