मुंबई, 31 मार्च : यंदाच्या वर्षाच्या आयपीएलला (IPL 2021) 9 मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) टीमला मोठा धक्का लागला आहे. ऑलराऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात हैदराबादने मिचेल मार्शला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मिचेल मार्शने दुखापतीमुळे नाही तर बायो-बबलमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयपीएलदरम्यान एवढा काळ आपण बायो-बबलमध्ये राहू शकत नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मार्शने सांगितलं. मार्शने याबाबत बीसीसीआय (BCCI) आणि सनरायजर्स हैदराबादला याबाबत माहिती दिली आहे. आयपीएलच्या बायो-बबल नियमानुसार मार्शला भारतात आल्यावर 7 दिवस हॉटेलमध्येच क्वारंटाईन, यानंतर त्याला 50 दिवस बायो-बबलमध्ये राहावं लागणार होतं. आयपीएलच्या मागच्या मोसमातही मार्श एकच मॅच खेळून बाहेर झाला होता. बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये मार्शच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो एकही सामना खेळू शकला नव्हता. हैदराबादने त्यावेळी मार्शऐवजी जेसन होल्डरला (Jason Holder) संधी दिली होती. यावेळी मिचेल मार्शच्या जागी जेसन रॉयची (Jason Roy) निवड करण्यात आली आहे. आयपीएल 2021 मध्ये दुखापत झाल्यानंतर मिचेल मार्श बराच काळ क्रिकेटपासून लांब होता. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधून तो पर्थ स्कॉचर्सकडून तो खेळला. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही तो ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये होता, त्या काळातही मार्श बायो-बबलमध्ये होता. मिचेल मार्शने मागच्या 10 वर्षात फक्त 21 आयपीएल सामने खेळले आहेत. तो डेक्कन चार्जर्स आणि पुणे वॉरियर्सच्या टीममध्येही होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.