लंडन, 5 ऑगस्ट : आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायच्या आधी राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) दुसरा धक्का बसला आहे. बेन स्टोक्स (Ben Stokes) याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासासाठी ब्रेक घेतल्यानंतर आता जोफ्रा आर्चर (Jofra Archer) वर्षभरासाठी क्रिकेटमधून बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराची दुखापत पुन्हा बळावली आहे. गेल्या काही काळापासून आर्चरला कोपराच्या दुखापतीने सतावलं आहे. दक्षिण आफ्रिका दौरा आणि भारत दौऱ्यातले काही सामने तसंच आयपीएलमध्येही आर्चर कोपराच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून आर्चर मैदानात उतरला, पण केंटविरुद्धच्या सामन्यात त्याला पुन्हा त्रास व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे त्याने अखेरचे दोन दिवस बॉलिंग केली नाही. न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या सीरिजमधूनही तो आधीच बाहेर झाला होता.
'मागच्या आठवड्यात जोफ्रा आर्चरच्या कोपराचं स्कॅनिंग करण्यात आलं. यामध्ये त्याच्या कोपराचं फ्रॅक्चर पुन्हा बळावलं आहे, यामुळे हे वर्ष क्रिकेट खेळणार नाही. भारताविरुद्धची सीरिज, टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आणि वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ऍशेसमध्येही (The Ashes) तो खेळणार नाही,' असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं.
'मे महिन्यामध्ये त्याच्या कोपरातून हाडाचा तुकटा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर तो खेळासाठी मैदानात उतरला, पण त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. आर्चरवर झालेली शस्त्रक्रिया स्ट्रेस फ्रॅक्चरवरची नव्हती,' असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे. जोफ्रा आर्चर आता काही काळ विश्रांती घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Jofra archer, Rajasthan Royals