Home /News /sport /

IPL 2021 : ऑस्ट्रेलियातल्या संघर्षानंतर पृथ्वी शॉ त्यांच्याकडे गेला आणि इतिहास घडला!

IPL 2021 : ऑस्ट्रेलियातल्या संघर्षानंतर पृथ्वी शॉ त्यांच्याकडे गेला आणि इतिहास घडला!

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध (CSK) 72 रनची आक्रमक खेळी केली.

    मुंबई, 11 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध (CSK) 72 रनची आक्रमक खेळी केली. बरोबर 4 महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेड टेस्टमध्ये भारताच्या लाजीरावण्या पराभवानंतर शॉला टीममधून डच्चू देण्यात आला. त्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शॉ बोल्ड झाला होता आणि त्याला दोन्ही इनिंग मिळून फक्त 4 रन करता आले होते. ऑस्ट्रेलियातल्या संघर्षानंतरही पृथ्वी शॉ हताश झाला नाही. भारतात परतल्यावर त्याने आपल्या बॅटिंगवर काम करायला सुरुवात केली. यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये शॉने इतिहास घडवला. एकाच मोसमात 800 रन करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला. पृथ्वी शॉने फक्त 38 बॉलमध्ये 72 रन केले, यात 9 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेटही 190च्या जवळ होता. फक्त 27 बॉलमध्येच शॉने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मॅच संपल्यानंतर शॉ म्हणाला, 'विजयानंतर चांगलं वाटत आहे. सगळ्यांनीच योगदान दिलं आणि ही चांगली सुरुवात होती. दुसऱ्या इनिंगमध्ये खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली होती. बॉल बॅटवर येत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून डच्चू मिळाल्यानंतर मी प्रविण आमरे (Pravin Amre) सरांकडे गेलो, त्यांच्यासोबत मी बॅटिंगवर चर्चा केली आणि मग स्थानिक क्रिकेट खेळलो, ज्याचा मला फायदा झाला. पुनरागमन करता आल्यामुळे मी खूप आनंदी आहे.' पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 165.40 च्या सरासरीने 827 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही 138.29 होता. शॉच्या या कामगिरीमुळे मुंबईने विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजय मिळवला. 'विजय हजारे ट्रॉफीमध्ये जाण्याआधी माझ्याकडे चांगली रणनिती होती. टीम इंडियातून का काढण्यात आलं याबाबत मला विचार करायचा नव्हता, कारण तो क्षण माझ्यासाठी निराशाजनक होता. पण मला पुढे जायचं होतं. माझ्या बॅटिंगच्या तंत्रात काहीतरी चुकत होतं, जे मला सुधारायचं होतं,' असं शॉ म्हणाला. आयपीएलच्या मागच्या मोसमात पृथ्वी शॉची कामगिरी निराशाजनक झाली. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला बाहेर बसवण्यात आलं, पण यावर्षी मात्र त्याने धमाकेदार सुरुवात केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Prithvi Shaw

    पुढील बातम्या