मुंबई, 16 एप्रिल: कोरोनाच्या चुकीच्या टेस्टचा फटका आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी आलेल्या परदेशी खेळाडूला बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फास्ट बॉलर एनरिच नॉर्किया (Anrich Nortje) याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट चुकीचा आल्यामुळे त्याला अधिकचे दोन दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागलं आहे. नॉर्किया शुक्रवारी आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा फास्ट बॉलर कोविड-19 टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर त्याने आयसोलेशन वाढवलं होतं. पाकिस्तानविरुद्धची सीरिज अर्धवट सोडून नॉर्किया दक्षिण आफ्रिकेच्या इतर खेळाडूंसह भारतात आयपीएल खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर आयपीएलच्या नियमांनुसार तो आयसोलेशनमध्ये होता, पण कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याचा आयसोलेशन कालावधी वाढवण्यात आला. नॉर्कियाची आरटी-पीसीआर टेस्ट लागोपाठ तीनवेळा निगेटिव्ह आल्यानंतर तो आता टीमसोबत आल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सने दिली आहे. ‘फास्ट बॉलर एनरिच नॉर्किया आता आयसोलेशनमधून बाहेर आहे. कोविड-19च्या चुकीच्या रिपोर्टनंतर पुढचे तीनवेळा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता तो दिल्ली कॅपिटल्सच्या बायो-बबलचा भाग आहे. आम्हाला त्याला बॉलिंग करताना बघायचं आहे,’ असं ट्वीट दिल्ली कॅपिटल्सने केलं आहे.
He's here 💙
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 16, 2021
Our 🇿🇦 pace superstar is now out of quarantine. After a false positive result for COVID-19, Anrich Nortje tested negative thrice, and is now part of our team bubble.
We can't wait to see him in action 🔥#YehHaiNayiDilli #IPL2021 @AnrichNortje02 @TajMahalMumbai pic.twitter.com/8dGh2GlniK
दिल्ली कॅपिटल्सने नॉर्कियाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. ‘रुममधून बाहेर येणं आणि नाश्ता करताना सगळ्यांना बघून चांगलं वाटत आहे. आजपासून सराव सुरू करणार आहे, त्यामुळे उत्साही आहे. स्टेडियममध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल भारतात होत आहे, हे आणखी चांगलं आहे,’ असं नॉर्किया म्हणाला आहे. आयपीएलमध्ये चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे प्रभावित झालेला नॉर्किया दुसरा खेळाडू आहे. याआधी कोलकात्याचा ओपनर नीतीश राणा यालाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. नीतीश राणा आयसोलेशनमधून बाहेर आला आणि त्यानंतर त्याने पहिल्या सामन्यात 80 रनची खेळीही केली.