अबु धाबी, 2 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) बॅट तळपत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात (CSK vs RR) ऋतुराजने नाबाद शतकी खेळी केली. आयपीएल करियरमधलं ऋतुराजचं हे पहिलंच शतक आहे. चेन्नईच्या इनिंगची शेवटची ओव्हर सुरू झाली तेव्हा ऋतुराज 95 रनवर खेळत होता आणि त्याला शतक पूर्ण करण्यासाठी 5 रनची गरज होती. मुस्तफिजूर अखेरची ओव्हर टाकायला आला तेव्हा रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) स्ट्राईकवर होता. जडेजाने मात्र पहिले 4 बॉल ऋतुराजला स्ट्राईकच दिला नाही, त्यामुळे त्याचं शतक आता हुकणार असंच वाटत होतं. चौथ्या बॉलला जडेजाने एक रन काढून ऋतुराजला स्ट्राईक दिला, यानंतर पाचव्या बॉलला त्याने एकही रन काढली नाही. इनिंगच्या अखेरच्या बॉलवर ऋतुराजने धोनी स्टाईलने सिक्स मारत शतक पूर्ण केलं. ऋतुराजच्या या शतकाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 190 रनचं आव्हान दिलं. ऋतुराजने 60 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले, यामध्ये 9 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तर जडेजाने 15 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले. मुस्तफिजूरच्या अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईने तब्बल 22 रन काढले. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये चेन्नईने 73 रन कुटले. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज गायकवाडने 500 रनचा टप्पा ओलांडला आहे. तसंच तो या मोसमात सर्वाधिक रन करणारा खेळाडूही बनला आहे. 12 मॅचमध्ये ऋतुराजने 50.80 ची सरासरी आणि 140.33 च्या स्ट्राईक रेटने 508 रन केले आहेत. यात 3 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. आयपीएलच्या या मोसमात चेन्नई सुपर किंग्स आधीच प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे. 11 पैकी 9 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर दोन सामने गमवावे लागले. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.