दुबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल 2021 चा मोसम (IPL 2021) आता अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएल प्ले-ऑफ (IPL Play Off) गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK vs DC) यांच्यात सामना होत आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दिल्लीची टीम फक्त तीन परदेशी खेळाडूंना घेऊन मैदानात उतरली आहे. स्टीव्ह स्मिथच्या ऐवजी दिल्लीने रिपल पटेलला पदार्पणाची संधी दिली आहे. तर चेन्नईने टीममध्ये तीन बदल केले आहेत. सॅम करनऐवजी ड्वॅन ब्राव्हो, आसिफऐवजी दीपक चहर आणि सुरेश रैनाऐवजी (Suresh Raina) रॉबिन उथप्पाला (Robin Uthappa) संधी देण्यात आली आहे.
आयपीएलच्या या मोसमात सुरेश रैना खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे रैनाला बाहेर करून उथप्पाला संधी द्यायची मागणी चेन्नईच्या चाहत्यांकडून आणि काही माजी क्रिकेटपटूंकडून केली जात होती. सुरेश रैना पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्सच्या टीमचा अविभाज्य भाग आहे. चेन्नईला तीनवेळा चॅम्पियन बनवण्यातही रैनाची भूमिका मोलाची राहिली. एमएस धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, यानंतर काही मिनिटांध्येच रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तसंच धोनी जेव्हा आयपीएलमधून निवृत्त होईल, तेव्हा आपणही संन्यास घेऊ, असं रैनाने आधीच जाहीर केलं आहे. एमएस धोनीमागे कायमच सावली सारखा उभ्या असलेल्या रैनाला निराशाजनक कामगिरीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. एमएस धोनीने मात्र रैना दुखापतीमुळे खेळत नसल्याचं सांगितलं आहे.
सुरेश रैनाने आयपीएलच्या या मोसमात 11 इनिंगमध्ये 17.77 च्या सरासरीने फक्त 160 रन केले, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 2020 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, यानंतर त्याने आयपीएलच्या मागच्या मोसमातूनही अचानक माघार घेतली. दुसरीकडे रॉबिन उथप्पाने आयपीएलच्या या मोसमात एकही सामना खेळलेला नाही. उथप्पाने 189 आयपीएल सामन्यांमध्ये 3,544 रन केले आहेत.
चेन्नईची टीम
ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जॉस हेजलवूड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Suresh raina