शारजाह, 30 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्स (CSK) प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा (SRH vs CSK) 6 विकेटने विजय झाला. हैदराबादने दिलेलं 135 रनचं माफक आव्हान चेन्नईने 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) 17 रनवर आणि एमएस धोनी 14 रनवर नाबाद राहिले. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) या ओपनिंग जोडीने चेन्नईला 75 रन करून दिले, ज्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. ऋतुराजने सर्वाधिक 45 रन केले, तर डुप्लेसिस 41 रन करून आऊट झाला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. राशिद खानला एक विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. चेन्नईच्या बॉलर्सनी हा निर्णय योग्य ठरवत हैदराबादला वारंवार धक्के दिले. 20 ओव्हरमध्ये हैदराबादला 7 विकेट गमावून फक्त 134 रनच करता आले. ऋद्धीमान साहाने सर्वाधिक 44 रनची खेळी केली. चेन्नईकडून हेजलवूडला 3 आणि ब्राव्होला 2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नव्हतं. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईची टीम प्ले-ऑफ खेळली नव्हती. यावर्षी मात्र त्यांनी पुन्हा एकदा धमाका केला आहे. 11 पैकी 9 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला, तर फक्त 2 सामने त्यांनी गमावले आहेत. दुसरीकडे हैदराबादची या मोसमातली हाराकिरी सुरूच आहे. या मोसमात हैदराबादला 11 पैकी फक्त 2 मॅचच जिंकता आल्या आहेत. प्ले-ऑफच्या रेसमधून हैदराबादची टीम आधीच बाहेर झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.