चेन्नई, 25 एप्रिल : कोरोना पॉझिटिव्ह ते पहिल्याच सामन्यात मॅच विनर, ही कामगिरी केली आहे दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) बापू, अर्थात अक्षर पटेलने (Axar Patel). रविवारी हैदराबाद आणि दिल्ली (SRH vs DC) यांच्यातला रोमांचक सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, यानंतर ऋषभ पंत याने अक्षर पटेलकडे विश्वासने बॉल दिला. अक्षर पटेलनेही कर्णधाराने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. सुपर ओव्हरमध्ये अक्षर पटेलने फक्त 7 रनच दिले.
अक्षर पटेलच्या समोर आक्रमक डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सेट झालेला केन विलियमसन (Kane Williamson) होता, पण त्याने या दोघांना एकही सिक्स मारून दिली नाही. सुपर ओव्हरच्या पहिल्या बॉलवर वॉर्नरने एकही रन काढला नाही, यानंतर दुसऱ्या बॉलवर एक रन काढून त्याने विलियमसनला स्ट्राईक दिला. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला विलियमसनने फोर मारली, यानंतर चौथ्या बॉलला अक्षरने एकही रन दिली नाही, तर पाचव्या बॉलला लेग बायची एक रन मिळाली. ओव्हरचा शेवटचा बॉल अक्षरने यॉर्कर टाकला, त्यामुळे पुन्हा एकदा हैदराबादला एकाच रनवर समाधानी रहावं लागलं. अशाप्रकारे अक्षरने ओव्हरमध्ये फक्त 7 रनच दिल्यामुळे दिल्लीला विजयासाठी 8 रनचं आव्हान मिळालं. ऋषभ पंत आणि शिखर धवनने हे आव्हान सहज पार केलं.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला बॅटिंगची संधी मिळाली नाही, पण बॉलिंगमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने 4 ओव्हरमध्ये 26 रन देऊन हैदराबादच्या 2 विकेट घेतल्या.
आयपीएल सुरू व्हायच्या आधीच अक्षर पटेलला कोरोनाने ग्रासलं. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अक्षर पटेल क्वारंटाईन झाला होता, त्यामुळे त्याला पहिले 4 सामने खेळता आले नव्हते. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अक्षर पटेल दिल्लीच्या टीमशी जोडला गेला आणि पहिल्याच सामन्यात त्याने धमाकेदार कामगिरी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axar patel, Coronavirus, Cricket, Delhi capitals, IPL 2021