'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत', ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा पंतप्रधानांवर निशाणा

'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत', ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा पंतप्रधानांवर निशाणा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर मायकल स्लेटर (Michael Slater) याने आपल्याच देशातलं सरकार आणि पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर मायकल स्लेटर (Michael Slater) याने आपल्याच देशातलं सरकार आणि पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी कोरोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलियन नागरिकांना भारतातून परत येण्यास नकार दिला आहे. सोमवारपासून दोन आठवड्यांपूर्वी भारतात गेलेला कोणताही ऑस्ट्रेलियन नागरिक पुन्हा मायदेशी परतू शकणार नाही, त्याचमुळे स्लेटरला घरी जाता येत नाहीये. हे निर्बंध लागू व्हायच्या आधीच स्लेटर भारतातून परतला, पण आता मालदीवमध्ये अडकला आहे. आयपीएलमध्ये (IPL 2021) कॉमेंट्री करण्यासाठी स्लेटर भारतात आला होता.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्बंधामुळे नाराज झालेला मायकल स्लेटर याने ट्वीट करत टीका केली. 'जर आमचं सरकार ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करणारं असतं, तर आम्हाला देशात परत जाता आलं असतं. हा आमचा अपमान आहे. पंतप्रधान तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. तुम्ही आमच्यासोबत असं कसं वागू शकता? तुमच्या क्वारंटाईन सिस्टीमचं काय झालं? आयपीएलमध्ये काम करण्यासाठी मी सरकारची परवानगी मागितली होती, पण आता मला सरकारच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे,' असं ट्वीट मायकल स्लेटरने केलं.

मागच्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाने भारतातून येणारी विमानसेवा 15 मे पर्यंत बंद केली आहे. भारतात प्रवास करून येणाऱ्यांचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं. तसंच कोरोनाचा धोका कमी झाला नाही, तर हे निर्बंध पुढेही कायम राहणार आहेत. तसंच हे नियम मोडून नागरिक भारतातून परतले, तर त्यांना 5 वर्षांपर्यंत जेल किंवा दंड भरावा लागू शकतो.

3 मे पासून हे निर्बंध लागू होतील, तसंच नियम मोडणाऱ्यांना 5 वर्षांपर्यंत शिक्षाही केली जाऊ शकते, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सांगितलं. तसंच पंतप्रधान मॉरिसन यांनी द गार्डियनला मुलाखत दिली. भारतात गेलेले ऑस्ट्रेलियन नागरिक ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग नव्हते, त्यामुळे त्यांनी घरी परतण्यासाठी स्वत:ची व्यवस्था स्वत:च करावी, असं मॉरिसन म्हणाले होते.

ऑस्ट्रेलियन सरकारचे हे निर्बंध लागू होण्याआधी एडम झम्पा, एन्ड्रयू टाय आणि केन रिचर्डसन दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहोचले. पण इतरांना 15 मेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. यानंतरही ऑस्ट्रेलियात निर्बंध कायम राहतील का नाही, याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 8:28 PM IST

ताज्या बातम्या