मुंबई, 12 जानेवारी : सात वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या एस. श्रीसंत (S. Sreesanth) याने आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या लिलावासाठी स्वत:च्या नावाची नोंदणी केली होती. पण आयपीएल खेळण्याचं श्रीसंतचं स्वप्न भंगलं आहे. आयपीएल संचालन परिषदेने खेळाडूंची संख्या कमी केल्यामुळे आता फक्त 292 खेळाडूंवर बोली लावली जाईल. लिलावाच्या या यादीमध्ये 164 भारतीय, 125 परदेशी आणि असोसिएट देशांचे खेळाडू आहेत.
श्रीसंतचा या यादीमध्ये समावेश झाला नसला, तरी तो केरळकडून सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळला होता. आयपीएल 2021 च्या लिलावासाठी श्रीसंतने त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये ठेवली होती. श्रीसंतशिवाय भारतीय टेस्ट टीमचा आधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चं नावही या यादीत नाही.
हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये आयपीएलच्या या मोसमासाठीचा लिलाव होणार आहे.
या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे सर्वाधिक 13 स्थानं उपलब्ध आहेत. तर सनरायजर्स हैदराबाद फक्त 3 खेळाडूंवर बोली लावू शकते. पंजाबच्या टीमकडे सर्वाधिक 53 कोटी 10 रुपये शिल्लक आहेत. तर हैदराबादकडे जवळपास 10 करोड़ 75 लाख रुपये आहेत. चेन्नईच्या खात्यात 22 कोटी 70 लाखांची किंमत उपलब्ध आहे. चेन्नई लिलावामध्ये जास्तीत जास्त 7 खेळाडूंना विकत घेऊ शकते. यावर्षी त्यांनी हरभजन आणि केदार जाधवला रिलीज केलं.
सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची बेस प्राईज 20 लाख रुपये आहे. तर शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड यांना सर्वाधिक बेस प्राईज (2 कोटी) देण्यात आली आहे. तर दीड कोटी किंमत असलेले 12 खेळाडू आहेत. हनुमा विहारी, उमेश यादव यांची बेस प्राईज 1 कोटी रुपये एवढी आहे. लिलावाला 18 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता सुरूवात होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2021, S sreesanth, Sports