मुंबई, 15 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठीचा लिलाव (IPL Auction 2021) 18 तारखेला चेन्नईत होणार आहे. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमसाठी मागील सिझन निराशाजनक गेला होता. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच धोनीच्या टीमला प्ले-ऑफ गाठता आली नाही. त्यामुळे आता या सिझनमध्ये पुन्हा एकदा भरारी घेण्याचं आव्हान या टीमसमोर आहे.
चेन्नईच्या टीममध्ये मागील वर्षी असलेला शेन वॉटसन हा आता निवृत्त झाला आहे. तर हरभजन सिंग, केदार जाधव आणि पियुष चावला यांना करारमुक्त केलं आहे. त्यामुळे आता या सिझनसाठी काही नव्या खेळाडूंची चेन्नईला गरज आहे.
भारताचा माजी ओपनर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) माजी कॅप्टन गौतम गंभीरनं कोणत्या खेळाडूंवर धोनी बोली लावू शकेल हे सांगितले आहे. सुरेश रैना परत आल्यानं चेन्नईची टीम मजबूत झाल्याचं गंभीरचं मत आहे. त्याचबरोबर रॉबीन उथप्पाचाही टीममध्ये समावेश झाल्यानं त्याचा बॅटींगला फायदा होईल असा अंदाज गंभीरनं व्यक्त केला आहे. चेन्नईकडं आता रैना, उथप्पा, रायडू आणि धोनी अशी मजबूत आणि अनुभवी बॅटिंग ऑर्डर असल्याचं गंभीरनं ‘स्टार स्पोर्ट्स’वरील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
( वाचा : IPL लिलावाआधी टीमच्या अडचणी वाढल्या, या खेळाडूंच्या खेळण्याबाबत साशंकता )
‘या’ दोघांवर लावणार बोली
चेन्नईकडं ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, सॅम करन आणि मिचेल स्टॅनर असे ऑल राऊंडर आहेत. तरीही चेन्नईला भारतीय ऑल राऊंडरची गरज असल्याचं मत गंभीरनं व्यक्त केलं. कृष्णाप्पा गौतमवर ( Krishnappa Gowtham) यंदा धोनी बोली लावेल असं गंभीरनं सांगितलं. कृष्णप्पा गौतम एक उपयोगी ऑफ स्पिनर आणि तळाचा उपयुक्त बॅट्समन आहे, जो जलद रन करतो. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं यंदा रिलीज केले आहे.
त्याचबरोबर ड्वेन ब्राव्होचा बॅक अप म्हणून ख्रिस मॉरीस (Chris Morris) हा खेळाडू देखील चेन्नईला उपयुक्त ठरेल असं गंभीरनं सांगितलं. ब्राव्होला दुखापतीमुळे मागचा सिझन पूर्ण खेळता आला नव्हता. महेंद्रसिंह धोनीचा ऑल राऊंडर्सवर नेहमी विश्वास असतो. त्यामुळे तो या दोघांवर बोली लावेल असा अंदाज गंभीरनं व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.