सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २- १ अशी आघाडी घेतली आहे. भारताने मेलबर्नवर झालेल्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत यजमानांचा १३७ धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून भारताने तब्बल २०१८ वर्षाचा शेवट विजयाने केला.
आता चौथ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडिया सिडनीमध्ये दाखल झाली असून मालिका जिंकण्याच्या आत्मविश्वासानेच ते मैदानात उतरतील. दरम्यान, वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती. पण ती तिथे उपस्थित असूनही तिने भारतीय संघाच्या फोटोमध्ये येण्याचा मोह आवरला.
३ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चौथा कसोटी सामना सिडनीत सुरू होणार आहे. भारत सध्या या मालिकेत २- १ ने आघाडीवर असल्यामुळे भारताला प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकत इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे.
दरम्यान कर्णधार विराटची पत्नी अनुष्का नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि पतीसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी सिडनीमध्ये गेली. यावेळी रात्री १२ वाजता दोघांनी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत त्यांच्या घरी गेले. यावेळी कोहलीने अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले.
इंग्लंड दौऱ्यावेळी जेव्हा भारतीय संघाने तेथील भारतीय दुतावासाला भेट दिली होती, तेव्हाही संघासोबत अनुष्का शर्मा उपस्थित होती. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन संघासोबतचा फोटो शेअर केला. यावेळी अनुष्का विराटच्या बाजूला पहिल्या रांगेत मधोमध उभी होती. तर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सर्वात मागे चौथ्या रांगेत उभा होता. हा फोटो तेव्हा चांगलाच ट्रोल झाला होता. तेव्हा अनुष्काला भारताची उप-कर्णधार ही उपोरोधीत उपाधीही देण्यात आली होती.
या चुकीतून धडा घेत मंगळवारी अनुष्का ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या घरी गेली असता ती ग्रुप फोटोंपासून जाणीवपूर्वक दूर राहिली. तिने कोहलीसोबत वेगळा फोटो काढत तो ट्विटरवर शेअर केला.
मात्र तिने आपली चूक सुधारली असली तरी क्रिकेट चाहत्यांनी मात्र तिने केलेल्या चुकीची जाणीवपूर्वक आठवण करुन दिली. अनेकांनी उप-कर्णधार अनुष्का कुठे आहे?… अनुष्का शर्माला फोटोत का घेतलं नाही? असे प्रश्न उचलत अनुष्का आणि बीसीसीआयला ट्रोल केले.