लंडन, 11 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय महिला टीमचा (India Women vs England Women) 8 रनने रोमांचक विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या 149 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 140 रनच करता आल्या. 14 ओव्हरमध्ये 106/2 अशी इंग्लंडची अवस्था होती, पण 20 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोअर 140/8 एवढाच झाला. भारताकडून पूनम यादवने (Poonam Yadav) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. टीम इंडियाने या सामन्यात तब्बल 4 रन आऊट केले. इंग्लंडकडून टॅमी ब्युमोंटने सर्वाधिक 59 रनची खेळी केली, तर हेथर नाईट 30 रन करून आऊट झाली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण ओपनर शफाली वर्माने (Shafali Varma) इंग्लंडच्या बॉलरवर आक्रमण केलं. स्मृती मंधना (Smriti Mandhana) आणि शफाली यांच्यात 70 रनची पार्टनरशीप झाली. शफालीने कॅथरीन ब्रंटला (Kathrin Brunt) 5 बॉलवर 5 फोर मारले. पहिल्या टी-20 मध्ये ब्रंटनेच शफालीला आऊट केलं होतं. शफाली वर्माने चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलपासून ते सहाव्या बॉलपर्यंत लागोपाठ 5 फोर लगावले. कॅथरिन ब्रंटने या सामन्याच्या 2 ओव्हरमध्येच 32 रन दिले. पहिल्या सामन्यात ब्रंटने शफालीला शून्य रनवर आऊट केलं होतं. यानंतर लगेचच पुढच्या सामन्यात शफालीने जोरदार पुनरागमन केलं. शफालीने या सामन्यात 38 बॉलमध्ये 48 रन केले, यात 8 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. पॉवर प्लेमध्ये भारतीय टीमने पहिल्या 6 ओव्हरमध्येच 49 रन केले होते. शफालीच टीम इंडियाची सर्वाधिक रन करणारी खेळाडू ठरली. स्मृती मंधना 20 रनवर आऊट झाली, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 31 रन, दीप्ती शर्माने नाबाद 24 रन, रिचा घोषने 8 रन आणि स्नेह राणाने नाबाद 8 रन केले. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये भारत 1-0 ने पिछाडीवर होता, त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. आता सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. याआधी वनडे सीरिजमध्येही भारताचा 2-1 ने पराभव झाला होता, तर एकमेव टेस्ट ड्रॉ झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.