अहमदाबाद, 20 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टी-20 सीरिज मधील 4 मॅच झाल्या आहेत, ही सीरिज सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे. टेस्ट सीरिजमधील पराभवानंतर इंग्लंडने टी-20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव केला. त्यानंतरची मॅच जिंकत भारताने मालिका बरोबरीत आणली. तर तिसरी मॅच इंग्लंडने आणि चौथी परत भारताने जिंकली. सीरिजचा निकाल आता काहीही लागला तरी या चार सामन्यांमध्ये एरव्ही न घडणाऱ्या काही घटना घडल्या.
तीन सामन्यांत तीन नव्या सलामीवीरांच्या जोड्या
पहिल्या टी-20 सामन्यात भारताने अनुभवी शिखर धवन आणि के. एल. राहुल यांना ओपनिंगला आले. या सामन्यात धवन चांगला न खेळल्याने कर्णधार विराटनं पुढच्या सामन्यात राहुलसोबत झारखंडचा विकेटकीपर फलंदाज ईशान किशनला ओपनिंगला पाठवलं. तिसऱ्या सामन्यात अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचं टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर तो आणि राहुल ही जोडी ओपनिंग बॅटिंगसाठी आली, त्यामुळे ईशानला मधल्या फळीत पाठवण्यात आलं.
मालिकेच्या मध्यातच प्रेक्षकांना बंदी
टेस्ट सीरिज दरम्यानही बराच काळ प्रेक्षकांना सामना बघायला येण्यास बंदी होती पण नंतर टी-20 क्रिकेट मालिका सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन मॅचमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायला परवानगी देण्यात आली. त्यानंतर अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या परवानगीने गुजरात क्रिकेट संघटनेने तिसऱ्या टी-20 सामन्यापासून प्रेक्षकांना येण्यास बंदी केली. एखाद्या क्रिकेट मालिकेत मधूनच प्रेक्षकांना बंदी करण्याची ही पहिली घटना आहे.
दोन सामन्यांत फक्त एक दिवस मोकळा
आतापर्यंत भारतात झालेल्या टी-20 क्रिकेट मालिकांमध्ये दोन सामन्यांच्यामध्ये किमान 2 ते 3 दिवसांचं अंतर राखलं जायचं. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती आणि सरावाला वेळ मिळायचा. या सीरिजमध्ये मात्र तसं झालं नाही. 12 मार्चपासून ही 5 मॅचची मालिका सुरू झाली आणि 10 दिवसांत 5 सामने आयोजित केले गेले.
एकाच स्टेडियमवर सामने
कोणत्याही क्रिकेट सीरिजमध्ये प्रत्येक सामना वेगवेगळ्या ठिकाणी खेळवला जातो. पण या सीरिजमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार सामने खेळवले गेले आहेत आणि पाचवा सामनाही तिथंच होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत, त्यामुळे एकाच ठिकाणी ही सीरिज खेळवण्यात येत आहे.
भारतात पहिल्यांदाच 5 टी-20 मॅचची सीरिज
भारतामध्ये पहिल्यांदाच 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. 5 टी-20 मॅचची सीरिज खेळण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. याआधी मागच्यावर्षी भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये 5 टी-20 खेळली होती, त्यावेळी पाचही मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Narendra modi stadium, Sports, T20 cricket