मुंबई, 12 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीएमध्ये (NCA) झालेल्या 2 किमी रनिंगच्या फिटनेस टेस्टमध्ये 6 भारतीय क्रिकेटपटू फेल झाले आहेत. यामध्ये संजू सॅमसन, ईशान किशन, नीतीश राणा, राहुल तेवतिया याशिवाय सिद्धार्थ कौल आणि जयदेव उनाडकट या खेळाडूंचा यात समावेश आहे. खेळाडूंचा फिटनेस पाहण्यासाठी बीसीसीआयने एनसीएमध्ये नव्या टेस्टला सुरूवात केली आहे. ही फिटनेस टेस्ट 6 खेळाडू पास करू शकले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करण्याची आणखी एक संधी मिळेल.
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार जर खेळाडू दुसऱ्यांदाही फिटनेस टेस्टमध्ये पास झाले नाहीत, तर त्यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 आणि तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी निवड होणार नाही. याआधी 2018 साली यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे सॅमसन, मोहम्मद शमी, अंबाती रायुडू यांना इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजला मुकावं लागलं होतं.
20 खेळाडूंनी दिली फिटनेस टेस्ट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजसाठी 20 पेक्षा जास्त संभाव्य खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली होती. यामध्ये यो-यो टेस्टशिवाय 2 किमी रनिंग टेस्टचाही समावेश होता. बॅट्समन, विकेट कीपर आणि स्पिनरना दोन किमी अंतर 8 मिनीटं 30 सेकंदात पूर्ण करायचं होतं. पण 6 क्रिकेटपटूंना हे अंतर वेळेत पूर्ण करता आलं नाही. तर काही क्रिकेटपटूंनी ठराविक वेळेत कशीबशी ही टेस्ट पास केली.
विराट कोहली आणि रवी शास्त्री खेळाडूंच्या फिटनेसबाबत खूप सतर्क आहेत. या फिटनेस टेस्टमुळे खेळाडूंच्या शारिरिक फिटनेसबाबतचे मापदंड समोर येतील, असं त्यांना वाटतं, असं बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Failure, Fitness test, India vs england, Sports