अहमदाबाद, 21 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली तिसरी टेस्ट 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीममध्ये स्पर्धा आहे. या मॅचआधी पिचबाबत टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रतिक्रिया दिली आहे. घरच्या टीमला आपल्या हिशोबाने पिच बनवण्याची सूट आहे. जेव्हा आम्ही परदेश दौऱ्यावर जातो तेव्हा आमच्याबाबत कोणीही विचार करत नाही. खेळपट्टी दोन्ही टीमसाठी एकसारखीच असते, असं रोहित शर्मा म्हणाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या पिचबाबत इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले होते. मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या दोन सत्रांमध्ये बॉल स्पिन होत असल्यामुळे ही खेळपट्टी पाचव्या दिवसाची वाटत आहे. घरच्या टीमला फायदा पोहोचवण्यासाठी, अशी खेळपट्टी तयार करण्यात आल्याची टीका मायकल वॉनने केली होती. मायकल वॉनच्या या टीकेला सुनील गावसकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. फक्त स्पिनर्सना मदत करणाऱ्या खेळपट्टीबाबत प्रश्न विचारले जातात, पण फास्ट बॉलरला मदत करणाऱ्या खेळपट्टीबाबत काहीच बोललं जात नाही, असं गावसकर म्हणाले. तर शेन वॉर्ननेही मायकल वॉनवर निशाणा साधला. इंग्लंडच्या बॉलरनी चांगली कामगिरी केली नाही, म्हणून रोहित शर्माने पहिल्या इनिंगमध्ये शतक केल्याचं शेन वॉर्न म्हणाला. चेन्नई टेस्टच्या चौथ्या दिवशी अश्विनने शतक केलं होतं. टीम इंडियाच्या स्पिनरनी इंग्लंडच्या 20 पैकी 17 विकेट घेतल्या, त्यामुळे भारताचा 317 रननी विजय झाला. पिचबाबत आयसीसीने नियम बनवावे ‘जेव्हा आम्ही परदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा आमच्यासाठी कोणीही विचार करत नाही, मग आम्ही दुसऱ्यांबाबत का विचार करायचा? जर टीका होत असेल, तर आयसीसीने पिचबाबत नियम बनवावे. कोणीही पिचच्या तक्रारी करू नये, कारण आम्ही तसं कधीच केलं नाही,’ असं वक्तव्य रोहित शर्माने केलं. डे-नाईट टेस्ट बॅट्समनसाठी आव्हानात्मक असेल, असं रोहितला वाटतं. भारताने घरच्या मैदानात एकच डे-नाईट टेस्ट खेळली आहे. 2019 साली बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात डे-नाईट टेस्ट खेळवली गेली होती. भारतात होणाऱ्या सगळ्या टेस्ट सीरिजमधली एक टेस्ट डे-नाईट होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आधीच स्पष्ट केलं आहे.