अहमदाबाद, 11 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजआधी टीम इंडियाला (India vs England) खूशखबर मिळाली आहे. टी-20 क्रमवारीमध्ये (ICC T-20 Ranking) भारतीय टीम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे, याआधी भारत क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडपासून भारतीय टीम 7 पॉईंट्स पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्ध 3-2 ने पराभव झाल्यानंतर भारतीय टीम एक स्थान वरती आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फक्त एक पॉईंटचा फरक आहे. टी-20 सीरिजमध्ये इंग्लंडचा पराभव करून भारताला नंबर एक टी-20 टीम बनण्याची संधी आहे. पण फक्त सीरिज जिंकूनच भागणार नाही. भारताला इंग्लंडला कमीत कमी 4-1 च्या अंतराने हरवावं लागेल. भारताचा जर 3-2 ने विजय झाला, तरीही इंग्लंड पहिल्या, भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर राहिल. राहुल पिछाडीवर टी-20 बॅट्समनच्या यादीत केएल राहुल एक स्थान खाली तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर कर्णधार विराट कोहली सहाव्या क्रमांकावर कायम आहे. बॅट्समनच्या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान पहिल्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच दुसऱ्या क्रमांकावर आहे. फिंचने न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या तीन टी-20 मॅचमध्ये 69, 79 आणि 36 रनची खेळी केली होती, त्यामुळे तो दोन स्थानं वरती आला. मार्टिन गप्टीलने या सीरिजमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने 218 रन केले, त्यामुळे तो तीन स्थान वर आठव्या क्रमांकावर आला. ऑस्ट्रेलियाचा एश्टन अगर आणि न्यूझीलंडच्या इश सोदीने 13 आणि 8 विकेट घेतल्या. एगर चार स्थान वर चौथ्या क्रमांकावर आणि सोदी तीन स्थान वर आठव्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सहा विकेट घेणारा श्रीलंकेचा स्पिनर लक्षण संदाकन नऊ स्थानवर 10व्या क्रमांकावर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.