चेन्नई, 31 जानेवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पण या सीरिजआधी इंग्लंडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ची भीती वाटत आहे. विराट कोहलीला आऊट कसं करायचं, हेच आम्हाला माहिती नसल्याचं वक्तव्य इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) ने केलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक विजयावेळी (India vs Australia) विराट टीम इंडियासोबत नव्हता, त्यामुळे आता चांगली कामगिरी करण्यासाठी विराट आणखी प्रेरित झाला असेल, असं मोईन अलीला वाटतं. पितृत्वाच्या रजेनिमित्त विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट झाल्यानंतर भारतात परतला होता. विराटची कोणतीच कमजोरी नाही, त्यामुळे त्याला आऊट कसं करायचं, हा प्रश्नच आहे. आमच्याकडे चांगले फास्ट बॉलर आहेत, अशी प्रतिक्रिया मोईन अलीने दिली. विराटच्या नेतृत्वात मोईन अली आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला. विराट चांगला माणूस आणि माझा चांगला मित्र आहे, पण आम्ही क्रिकेटबद्दल जास्त बोलत नाही, असं मोईन अलीने सांगितलं. माझी टीममध्ये निवड होते का नाही, ते मला माहिती नाही, पण मी तयार आहे. मला खूप काळ वाट बघायला लागली. आताही आपण मॅच जिंकवणारी कामगिरी करू शकतो. भारताच्या आव्हानासाठी आपण तयार असल्याचं मोईन अली म्हणाला. कोरोना झाल्यामुळे मोईन अलीला श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं. या सीरिजमध्ये इंग्लंडचा 2-0 ने विजय झाला होता. मोईन अलीने टेस्ट क्रिकेटमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत, सोबतच त्याने 2,782 रनही केल्या आहेत. चार टेस्टसोबतच इंग्लंड आणि भारत यांच्यात तीन वनडे आणि पाच टी-20 मॅचची सीरिजही होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.