विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्याकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा चाहत्यांना असते. पण टीम इंडियाचा कर्णधार मात्र वारंवार अपयशी होत आहे. मागच्या 50 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीला एकही शतक करता आलेलं नाही. लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही (India vs England Third Test) विराट कोहली 7 रन करून आऊट झाला, त्यामुळे विराटच्या शतकांचा दुष्काळ 50 इनिंगपर्यंत पोहोचला आहे.
विराट कोहलीने आपलं अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक 22 नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध केलं होतं. कोलकाता टेस्टमध्ये विराटने 136 रनची खेळी केली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ 50 इनिंगनंतरही विराटला शतक करता आलेलं नाही. विराटच्या करियरमधला हा सगळ्यात खराब काळ सुरू आहे. याआधी लागोपाठ 25 इनिंगमध्ये विराटला शतक करता आलं नव्हतं.
2020 पासून विराटने फक्त 23 च्या सरासरीने रन केले. विराटने 1 जानेवारी 2020 पासून 11 टेस्टमध्ये 414 रन केले आहेत. मागच्या 10 टेस्टमध्ये त्याची सरासरी फक्त 24.56 एवढी आहे.
विराट कोहली पुन्हा एकदा जेम्स अंडरसनसमोर (James Anderson) संघर्ष करताना दिसत आहे. नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर अंडरसनने विराटला आऊट तेलं. यानंतर आता लीड्स टेस्टमध्येही अंडरसनने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
टेस्ट क्रिकेटमध्ये अंडरसनने विराटला 7व्यांदा आऊट केलं आहे. अंडरसनशिवाय ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायननेही (Nathon Lyon) विराटला टेस्ट क्रिकेटमध्ये 7 वेळा आऊट केलं. अंडरसनने सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) टेस्ट क्रिकेटमध्ये 9 वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.
विराट कोहली त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त दोन बॉलर्ससमोर 10 पेक्षा जास्त वेळा आऊट झाला आहे. यामध्ये पहिलं नाव न्यूझीलंडच्या टीम साऊदीचं (Tim Southee) आहे. आता यामध्ये जेम्स अंडरसनचं नावही जोडलं गेलं आहे.