कोलकाता, 20 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात ऐतिहासिक डे/नाइट कसोटी सामना होणार आहे. याबद्दल निवृत्ती घेतलेले ऑस्ट्रेलियाचे पंच सायमन टफेल यांनी सांगितले की, अंधार पडल्यानंतर चेंडू पाहणं फक्त फलंदाजांसाठीच नाही तर पंचांसाठीदेखील आव्हानात्मक असणार आहे. तसेच नवा रंग असल्यानं पंचांनी सरावात भाग घेण्याची गरज आहे. अॅडलेडवर पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या टेस्टवेळी सायमन टफेल उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की, चेंडू स्पष्ट पाहण्यासाठी पंच कृत्रिम लेन्स वापरू शकतात. सायमन टफेल यांनी सांगितलं की, मला नाही माहिती की चेंडूला वेगळ्या पद्धतीने पाहण्यासाठी कोणत्या प्रकारच्या लेन्सचा वापर करतील किंवा नाही. हे त्या पंचांवर अवलंबून आहे. मात्र त्यांना जितकं शक्य होईल तितका नेट सरावात भाग घ्यायला हवा. अंधार पडल्यानंतर प्रकाशात बदल होईल आणि सुर्यप्रकाशाऐवजी लाइट लावल्या जातील. तेव्हा चेंडू दिसण्यात फलंदाजासमोर मोठं कठीण आव्हान असेल. मला वाटतं की पंचांसाठीदेखील हे आव्हान असेल असं सायमन टफेल म्हणाले. टफेल हे त्यांचे पुस्तक फाइंडिंग द गॅप्स या पुस्तकाच्या प्रमोशननिमित्त भारतात आले आहेत. कोलकात्यातील ऐतिहासिक कसोटीवेळी ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला टफेल यांनी दिला आहे. त्यांना गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव नाही. त्याउलट भारताचे अनेक क्रिकेटपटू घरेलू क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूवर खेळले आहेत. बांगलादेशने एकमेव डे/नाइट सामना 2013 मध्ये खेळला होता. तेव्हाच्या संघातील एकही खेळाडू सध्याच्या संघात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







