कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात आज ऐतिहासिक सामना होत आहे. इडन गार्डनच्या मैदानात भारतीय क्रिकेटमधल्या गुलाबी पर्वाला सुरुवात झाली. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. 15 ओव्हरच्या आतच बांगलादेशचा जवळ जवळ अर्धा संघ माघारी परतला आहे. बांगलादेशच्या फलंदाजांची अडखळत सुरुवात झाली. इशांत शर्मानं इम्रूल कायेसला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते रोहित शर्मानं. 10व्या ओव्हरमध्ये उमेश यादवच्या हातात चेंडू सोपवल्यानंतर त्यानं बांगलादेशच्या फलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्याच चेंडूवर कर्णधार मोमिनूल हकला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. मात्र यात रोहित शर्मानं घेतलेला झेल चर्चेचा विषय बनला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितनं हवेत सूर मारत मोमिनूलला बाद केले. पण खरतर हा कॅच विराटचा होता. मोक्याच्या क्षणी रोहितनं हवेत उडी घेत कॅच घेतला. रोहितच्या या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यानंतर उमेश यादवनं मोहम्मद मिथूनला शुन्यावर माघारी धाडले. पुढच्याच ओव्हरमध्ये शमीनं मुशफिकूर रहिमला शुन्यावर माघारी पाठवले. बांगलादेशचे तीन अनुभवी फलंदाजी शुन्यावर बाद झाले. तर, भारताकडून आतापर्यंत उमेश यादवनं 2, शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या आहेत. दरम्यान या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतानं संघात कोणताही बदल केलेला नाही. सलामीवीर लयीत मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधील सलामीवीराची भूमिका आता समर्थपणे सांभाळली आहे. इंदूर कसोटी मयंकने द्विशतक साकारले आहे, तर रोहित सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांची भक्कम मधली फळी भारताला 500 धावसंख्येपर्यंत मजल मारून देण्याइतपत समर्थ आहे. चेतेश्वर पुजारालाही सूर गवसला आहे. डे-नाइट सामन्याचे नियम पारंपारिक सामन्यापेक्षा या सामन्याचे नियम वेगळे असणार आहेत. पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

)







