धर्मशाला, 25 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पराभव झाल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेला (India vs Sri Lanka T20 Series) मोठा धक्का बसला आहे. टीमचा मिस्ट्री स्पिनर महीश तीक्षणा (Maheesh Tikshana) भारताविरुद्धच्या उरलेल्या दोन्ही टी-20 मधून हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. सोबतच कुसल मेंडिसही (Kusal Mendis) दुखापतीमुळे बाहेर आहे, पण टेस्ट सीरिजपर्यंत तो फिट होईल, अशी अपेक्षा श्रीलंकन टीमला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निरोशन डिकवेला आणि धनंजय डि सिल्वा यांना टीममध्ये बोलावण्यात आलं आहे. श्रीलंकेच्या टीममधला फास्ट बॉलर शिरन फर्नांडोही दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. दुखापतींनी ग्रासलेल्या श्रीलंकन टीमला दिलासाही मिळाला आहे. फास्ट बॉलर बिनुरा फर्नांडो आता पूर्णपणे फिट झाला असून त्याने सरावाला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये फर्नांडोची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. धर्मशालामधल्या टी-20 मॅचमध्ये तो निवडीसाठी उपलब्ध आहे. दुसरीकडे कुसल मेंडिस टी-20 आधी फिट होऊन टीममध्ये येण्याची शक्यता कमी आहे. टेस्ट सीरिजसाठी मात्र तो फिट होईल, असं सांगितलं जात आहे. दोन्ही टीममध्ये 4 मार्चपासून मोहालीमध्ये पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यानंतर मेंडिसने श्रीलंकेसाठी एकही टेस्ट खेळलेली नाही. त्याआधी तो लागोपाठ 4 इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला होता. पण त्यानंतर प्रतिस्पर्धी क्रिकेटमध्ये मेंडिस चांगल्या फॉर्ममध्ये होता. कोविड प्रोटोकॉल तोडून बायो-बबल बाहेर गेल्यामुळे मेंडिसचं 6 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 सीरिजच्या पाचव्या आणि अखेरच्या मॅचमध्ये मेंडिस प्लेयर ऑफ द मॅच होता. महीश तीक्षणा टीमबाहेर होणं हा श्रीलंकन टीमसाठी मोठा धक्का आहे, कारण आधीच वानिंदु हसरंगा कोरोनामुळे ही सीरिज खेळू शकणार नाही. मागच्या 6 महिन्यांमध्ये तीक्षणाने पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टी-20 सीरिजची दुसरी आणि तिसरी मॅच शनिवार आणि रविवारी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे. भारत सध्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.