कोलंबो, 20 जुलै: दीपक चहरच्या (Deepak Chahar) अफलातून खेळीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 3 विकेटने पराभव केला आहे. याचसोबत भारताने 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. दीपक चहरने 82 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली, तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) 28 बॉलमध्ये नाबाद 19 रन केले. श्रीलंकेने ठेवलेल्या 276 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 193/7 अशी झाली होती. तेव्हा हा सामना श्रीलंका जिंकेल असं वाटत होतं, पण दीपक चहरने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. भुवनेश्वर कुमारनेही चहरला चांगली साथ दिली.
श्रीलंकेचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ 13 रनवर आणि इशान किशन 1 रन करून आऊट झाले, तर कर्णधार शिखर धवन 29 रनवर माघारी परतला. मनिष पांडेने 31 बॉलमध्ये 37 रन केले. आपली दुसरीच वनडे खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने 53 रनची उत्कृष्ट खेळी केली. हार्दिक पांड्या शून्य रनवर आऊट झाला, तर त्याचा भाऊ कृणाल 35 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
श्रीलंकेकडून वानिंडू हसारंगाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर कसून रजिता, लक्षण संडकन आणि दासून शनाका यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) बॅट्समनना मोठा स्कोअर करण्यात पुन्हा अपयश आलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 275 रन केले. आविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि मिनोद भानुका (Minod Bhanuka) यांनी श्रीलंकेला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. 77 रनवर श्रीलंकेची पहिली विकेट गेली. मागच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही श्रीलंकेच्या बॅट्समनना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही.
आविष्का फर्नांडोने 50 रन आणि चरिथ असलंकाने 65 रनची खेळी केली. चमिका करुणारत्ने 44 रनवर नाबाद राहिला. मिनोद भानुका 36 रनवर, धनंजया डि सिल्वा 32 रनवर आऊट झाले. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर दीपक चहरला (Deepak Chahar) 2 विकेट घेण्यात यश आलं.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka Second ODI) कर्णधार दासून शनाका याने पुन्हा एकदा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पहिली वनडे जिंकणाऱ्या खेळाडूंनाच शिखर धवनने (Shikhar Dhawan) टीममध्ये संधी दिली आहे. तर श्रीलंकेने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. इसरू उडानाच्याऐवजी कसूर रजिता याला संधी दिली. याआधी पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने दणदणीत विजय झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India, India Vs Sri lanka, Sports, Sri lanka