धर्मशाला, 27 फेब्रुवारी : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 6 विकेटने विजय झाला आहे, याचसोबत भारताने ही सीरिजही 3-0 ने जिंकली आहे. श्रीलंकेने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 16.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 45 बॉलमध्ये 73 रनची नाबाद खेळी केली, तर रवींद्र जडेजाही 15 बॉलमध्ये 22 रनवर नाबाद राहिला. श्रीलंकेडकडून लाहिरु कुमाराला 2 विकेट मिळाल्या, तर दुष्मंता चमीरा आणि चमिका करुणारत्नेला 1 विकेट घेण्यात यश आलं. श्रेयस अय्यरचं तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमधलं हे तिसरं अर्धशतक होतं. याआधी त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 57 रन आणि नाबाद 74 रनची खेळी केली होती. तीन मॅचच्या सीरिजमध्ये श्रेयसने तिन्ही अर्धशतकं नाबाद केली, ज्यामुळे भारताला विराट कोहलीची कमी जाणवली नाही. टी-20 फॉरमॅटमधला टीम इंडियाचा हा लागोपाठ 12 वा विजय आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 ने, वेस्ट इंडिजला 3-0 ने आणि आता श्रीलंकेलाही 3-0 ने धूळ चारली. टी-20 फॉरमॅटमध्ये लागोपाठ सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे. याआधी अफगाणिस्ताननेही या फॉरमॅटमध्ये लागोपाठ 12 विजय मिळवले होते. टीम इंडिया आता टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच थेट जून महिन्यात खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम टी-20 सीरिजसाठी भारत दौऱ्यावर असणार आहे, त्यावेळी पहिल्याच सामन्यात भारताला हा विक्रम करण्याची संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







