मुंबई, 12 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) धमाकेदार कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांची वनडे सीरिजसाठीची निवड निश्चित मानली जात आहे, पण शिखर धवनचा (Shikhar Dhawan) फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे. जानेवारी महिन्यात ही सीरिज होणार आहे, त्याआधी बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. वनडे सीरिजआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या सध्याच्या सत्रात ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यरने यांनी अनुक्रमे 3 आणि 2 शतकं केली आहेत. याशिवाय फास्ट बॉलिंग करणाऱ्या अय्यरने विकेटही घेतल्या आहेत, त्यामुळे तो दुखापतग्रस्त असलेल्या हार्दिक पांड्याची जागा घेण्यासाठी तयार आहे. केएल राहुल आणि रोहित शर्माच्या उपस्थितीमध्ये अय्यरला ओपनिंगला संधी मिळणं कठीण आहे, त्यामुळे त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं.
रविवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चंडीगडविरुद्धच्या सामन्यात शानदार 151 रन केले. मध्य प्रदेशने 13.4 ओव्हरमध्ये 56 रनवर 4 विकेट गमावल्या होत्या. व्यंकटेश अय्यर सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि चंडीगडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. त्याने 88 बॉलमध्ये 7 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. 113 बॉलमध्ये 151 रन करून अय्यर आऊट झाला. व्यंकटेशने या इनिंगमध्ये 8 फोर आणि 10 सिक्स मारल्या.
याआधी त्याने केरळविरुद्ध 9 डिसेंबरला 84 बॉलमध्ये 112 रन केले. तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. याशिवाय त्याने बॉलिंगमध्येही कमाल केली होती. अय्यरने त्या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. एक दिवस आधी उत्तराखंडविरुद्ध त्याने 71 रनची खेळी केली आणि 2 विकेटही मिळवल्या. म्हणजेच त्याने स्पर्धेत बॅटिंगसह बॉलिंगमध्येही कमाल केली आहे. आतापर्यंत अय्यरने 4 इनिंगमध्ये 139 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 348 रन केले, यामध्ये 2 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
'व्यंकटेश दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तो प्रत्येक सामन्यात 9-10 ओव्हर बॉलिंग करत आहे. हार्दिकच्या दुखापतीमुळे व्यंकटेशला संधी द्यायची ही योग्य वेळ आहे. टीम मॅनेजमेंटने त्याला मधल्या फळीत बॅटिंग करण्याचा योग्य सल्ला दिला आहे. जर त्याला दुखापत झाली नाही, तर तो निश्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल,' असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानेही त्याचा आयपीएल 2021 चा फॉर्म विजय हजारे ट्रॉफीमध्ये कायम ठेवला आहे. गायकवाडने श्रीलंका दौऱ्यात 2 टी-20 मॅच खेळल्या होत्या, पण त्याला वनडेमध्ये संधी मिळाली नव्हती. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही त्याला संधी मिळाली नव्हती, कारण रोहित ओपनिंगला खेळत होता आणि त्याच्यासोबत राहुल आणि इशान किशन होते. गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध 136, छत्तीसगडविरुद्ध नाबाद 154 आणि केरळविरुद्ध 124 रनची खेळी केली होती. गायकवाडच्या या कामगिरीकडे निवड समितीला दुर्लक्ष करता येणार नाही.
शिखर धवन फेल
दुसरीकडे शिखर धवनने 0,12,14 आणि 18 रन केले आहेत, त्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थान अडचणीत आलं आहे. याआधी भारताने वनडे सीरिज खेळली तेव्हा श्रीलंकेत शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.