सेंच्युरियन, 29 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये पहिली टेस्ट (India vs South Africa 1st Test) मॅच सुरू आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने मॅचवरची आपली पकड आणखी मजबूत केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचं मोठं आव्हान दिलं. भारताच्या या कामगिरीनंतरही महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) नाराज झाले. याला कारण ठरलं विराट कोहलीने मैदानात पुन्हा केलेली तिच चूक. विराट या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये ऑफ स्टम्पच्या बाहेर असणाऱ्या बॉलवर ड्राईव्ह मारायला गेला आणि खेळपट्टी मागे कॅच आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये लुंगी एनगिडीच्या बॉलिंगवर ड्राईव्ह मारण्याच्या नादात विराटने पहिल्या स्लिपमध्ये कॅच दिला. पहिल्या इनिंगमध्ये विराट 35 रनवर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्येही विराटने अगदी तशीच चूक केली. मार्को जॅनसनने ऑफ स्टम्पबाहेर टाकलेल्या बॉलवर विराटने पुन्हा एकदा तसाच शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण विकेट कीपर क्विंटन डिकॉकने त्याचा कॅच पकडला.
Marco Jansen bringing the magic on debut🤩 #SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/7cYIorUwsY
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 29, 2021
विराट आऊट झाला तेव्हा सुनिल गावसकर कॉमेंट्री करत होते, यावेळी त्यांनी विराटच्या या शॉटवर प्रश्न उपस्थित केले. ‘हा बॉल विराटने सोडायला पाहिजे होता. लंच ब्रेकनंतर भारतीय टीम नुकतीच बॅटिंगला आली आहे, त्यामुळे विराटने थोडा वेळ थांबायला हवं होतं. ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल होता, पहिल्या इनिंगमध्येही विराट तसाच आऊट झाला,’ असं गावसकर म्हणाले. ‘लंचनंतरच्या पहिल्याच बॉलवर विराटन असा शॉट खेळला. टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू विश्रांतीनंतर सेट व्हायला थोडा वेळ घेतो. कोहलीकडे एवढा अनुभव आहे, कदाचित जलद रन करून डाव घोषित करण्याच्या नादात विराटने हा शॉट मारण्याचा निर्णय घेतला असेल,’ असं वक्तव्य गावसकरांनी केलं. 2020 पाठोपाठ 2021 मध्येही विराट कोहलीला शतक करता आलेलं नाही. विराटचं अखेरचं शतक 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या टेस्टमध्ये आलं होतं. कोलकात्यामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या डे नाईट सामन्यात विराटने तीन आकडी धावसंख्या गाठली होती. याच्या 25 महिन्यांनंतरही विराटला वनडे, टेस्ट आणि टी-20 मध्ये शतक करता आलेलं नाही. विराटच्या नावावर 97 टेस्टमध्ये 27 शतकं आहेत.