मुंबई, 2 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) शुक्रवार 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे. कानपूरमधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर आता सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. या सामन्यातही टीम इंडियाच्या पदरी निराशा आली, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचं मोठं नुकसान होईल. मुंबई टेस्टमधून विराट कोहली टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 मॅचची सीरिज आणि कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट खेळला नव्हता. विराटच्या पुनरागमनामुळे भारतीय टीममध्ये बदल होणार हे निश्चित आहे.
पहिल्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. पहिल्या टेस्टमध्ये अखेरच्या दिवशी बॅटिंग करून न्यूझीलंडला टेस्ट मॅच ड्रॉ करण्यात यश आलं होतं. भारताचा ओपनर मयंक अग्रवाल याला पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये अपयश आलं होतं, त्यामुळे त्याला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळणं मुश्कील आहे. दुसरा ओपनर शुभमन गिल याने पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक करत आपलं टीममधलं स्थान निश्चित केलं आहे.
रहाणे-पुजारा फॉर्ममध्ये नाही
टीमचे वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत, पण न्यूझीलंड सीरिजनंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे, त्यामुळे या दोघांनाही दुसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळू शकते. पहिल्या टेस्टमधून श्रेयस अय्यरने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्याने शतक आणि अर्धशतक केलं. असा विक्रम करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला, त्यामुळे दुसऱ्या टेस्टसाठी श्रेयस अय्यरने त्याचं टीममधलं स्थान निश्चित केलं आहे.
तीन स्पिनरचं स्थान निश्चित
आर.अश्विन (R Ashwin), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांचं वानखेडे स्टेडियमवर खेळणं निश्चित मानलं जातयं. विकेट कीपर बॅटर ऋद्धीमान साहा याने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं, पण त्याला मानेच्या दुखापतीमुळे त्रास होत होता, त्यामुळे युवा विकेट कीपर केएस भरत याला पदार्पणाची संधी मिळू शकते. साहाला दुखापत झाल्यामुळे कानपूर टेस्टमध्ये केएस भरत विकेट कीपिंगसाठी आला होता, तेव्हा त्याने अनेकांना प्रभावित केलं होतं.
फास्ट बॉलर इशांत शर्माही (Ishant Sharma) पहिल्या टेस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकला नव्हता. उमेश यादवने (Umesh Yadav) मात्र चांगली बॉलिंग केली होती, त्यामुळे इशांतऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.
भारताची संभाव्या प्लेयिंग-11
केएस भरत, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.