मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : वॉशिंग्टनचा 'सुंदर' खेळ, पण न्यूझीलंडने मारली बाजी; भारताचा पराभव

IND vs NZ : वॉशिंग्टनचा 'सुंदर' खेळ, पण न्यूझीलंडने मारली बाजी; भारताचा पराभव

india vs new zealand

india vs new zealand

न्यूझीलंडने देिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

रांची, 27 जानेवारी : न्यूझीलंडने भारताला पहिल्या टी20 सामन्यात 21 धावांनी पराभूत केलं. 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 9 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. गोलंदाजीसह फलंदाजीतही जबरदस्त खेळी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरचे योगदान भारताला विजय मिळवून देण्यासाठी अपुरे पडले. वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी करताना 5 च्या इकॉनॉमी रेटने 4 षटकात 22 धावा देत दोन गडी बाद केले. तर फलंदाजीत अर्धशतक करताना 28 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार मारले.

न्यूझीलंडने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३ बाद १५ अशी झाली होती. इशान किशन आणि राहुल त्रिपाठी आणि शुभम गिल यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरत अर्धशतकी भागिदारी केली. मात्र १२ व्या षटकात इश सोधीने सुर्यकुमार यादवला बाद केलं. सुर्यकुमार यादवने ३४ चेंडूत ४७ धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्याही पुढच्याच षटकात बाद झाला. ब्रेसवेलने स्वत:च्याच गोलंदाजीवर पांड्याचा झेल घेतला. तर दिपक हुड्डाला सँटनरच्या गोलंदाजीवर कॉनवेनं यष्टीचित केलं. शिवम मावी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.

हेही वाचा : 'तेरे दिलसे ना खेलूंगा', अक्षरचा क्रिकेट डान्स; रिसेप्शनमधला VIDEO VIRAL

तत्पूर्वी,  नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला 176 धावा करता आल्या. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. पण फटकेबाजी करणाऱ्या फिन एलनला वॉशिंग्टन सुंदरने बाद केलं. त्यानंतर मार्क चॅपमनलासुद्धा त्याच षटकात तंबूत धाडलं. संघाच्या ४३ धावा झाल्या असताना त्यात एकट्या फिनच्या ३५ धावा होत्या.

न्यूझीलंडची अवस्था २ बाद ४३ असताना ग्लेन फिलिप्स आणि डेवॉन कॉनवे यांनी ६० धावांची भागिदारी केली. ग्लेन फिलिप्सला १७ धावांवर कुलदीप यादवने बाद केलं. त्यानतंर अर्शदीप सिंगने अर्धशतक करणाऱ्या डेवॉन कॉनवेला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केलं. तर न्यूझीलंडचा धडाकेबाज गोलंदाज मायकल ब्रेसवेल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.

अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात मिशेल सँटनर शिवम मावीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर डेरिल मिशेलने ३० चेंडूत ५९ धावांची तुफान फटकेबाजी केली. त्याने अर्शदीपने टाकलेल्या अखेरच्या षटकात सलग तीन षटकार आणि एका चौकारासह २७ धावा वसूल केल्या.

First published:

Tags: Cricket