लंडन, 20 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध (India vs England Lords Test) ऐतिहासिक विजय मिळवला. या कामगिरीमुळे भारतीयच नाही तर इंग्लंडच्या चाहत्यांनीही टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलं. या सामन्यात भारतीय टीम वेगळ्याच जोशात दिसली. भारतीय टीमच्या या जोशाचं कारण ठरलं मैदानात घडलेली एक घटना. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगच्या अखेरीस जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जेम्स अंडरसनला (James Anderson) बाऊन्सर टाकले. यातले काही बॉल अंडरसनच्या शरिरावर आपटले, त्यामुळे अंडरसन चांगलाच संतापला. यानंतर अंडरसन बुमराहला नेमकं काय म्हणाला? याचं उत्तर आता अश्विनने (R Ashwin) दिलं आहे. अंडरसनने बुमराहवर बेईमानीचा आरोप केला.
गुरूवारी आर.अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर फिल्डिंग कोच आर श्रीधर (R Shridhar) यांच्यासोबत लॉर्ड्स टेस्टबाबत चर्चा केली. ही चर्चा तामीळ भाषेत झाली असली तरी एका चाहत्याने इंग्रजी सबटायटलसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बुमराह बॅट्समनना स्लो बॉल टाकत होता पण आपल्याला फास्ट बॉल टाकत होता, असा आरोप अंडरसनने केला. 'तू दुसऱ्यांना 80-85 मैल प्रती तासाच्या वेगाने दुसऱ्यांना बॉलिंग करतोस, पण मला 90 मैल तासाने बॉलिंग करत आहेस, ही बेईमान आहे,' असं अंडरसन म्हणाल्याचं अश्विनने सांगितलं.
ड्रेसिंग रूममध्ये परतताना बुमराहने मी मुद्दाम फास्ट बॉलिंग केली नसल्याचं अंडरसनला सांगितलं. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि जेम्स अंडरसन यांच्यातही बाचाबाची झाली.
मॅचच्या पाचव्या दिवशी बुमराह बॅटिंगला आला तेव्हा इंग्लंडच्या बॉलरनी त्याच्यावर बाऊन्सरचा मारा सुरू केला. यातला एक बॉल बुमराहच्या डोक्यावरही लागला, पण बुमराहने अंडरसनसारखी तक्रार केली नाही. बुमराहने मोहम्मद शमीसोबत 9व्या विकेटसाठी 89 रनची पार्टनरशीप केली, त्यामुळे भारताने इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 120 रनवर ऑल आऊट झाला. याचबरोबर भारताने 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.