मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'हे तर इच्छा मरण', दोन खेळाडू टीममध्ये नसल्याने थरूर विराटवर भडकले

IND vs ENG : 'हे तर इच्छा मरण', दोन खेळाडू टीममध्ये नसल्याने थरूर विराटवर भडकले

टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरूर यांची टीका

टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरूर यांची टीका

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीममध्ये दोन बदल केले. आर. अश्विन (R Ashwin) याला टीममध्ये न घेतल्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला.

पुढे वाचा ...

लंडन, 2 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीममध्ये दोन बदल केले. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांना निवडण्यात आलं. या सामन्यात अश्विनला (R Ashwin) संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण विराटने टॉसवेळी जेव्हा टीमची घोषणा केली तेव्हा अनेकांची निराशा झाली, कारण प्लेयिंग इलेव्हनमध्ये अश्विनचं नाव नव्हतं. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आहे, तरीही त्याला पहिल्या चारही टेस्टमध्ये खेळवण्यात आलं नाही.

मायकल वॉन (Michael Vaughan) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनी टीम इंडियाच्या या निर्णयावर टीका केली. अश्विनला न खेळवणं हा हट्टीपणा आहे, असं शेन वॉर्न म्हणाला. भारतापेक्षा इंग्लंडची टीम जास्त संतुलित आहे. मी अश्विनला प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवडलं असतं. ओव्हलची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करते. फक्त पहिल्या इनिंगसाठी तुम्ही टीम निवडत नाही. इकडे बॉल स्पिन होतो आणि अश्विनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 5 शतकं आहेत. तरीही तुम्ही टीममध्ये एक असा बॅट्समन खेळवता, जो चांगली बॉलिंग करू शकतो, अशी टीका शेन वॉर्नने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना केली.

मायकल वॉननेही टीम इंडियाच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 413 टेस्ट विकेट आणि 5 शतकं. यानंतरही अश्विनची टीममध्ये निवड होत नाही. इंग्लंडमध्ये 4 टेस्टमध्ये क्वचितच असं बघितलं गेलं असेल. हा खरंच मूर्खपणा आहे, असं मायकल वॉन म्हणाला.

दुसरीकडे काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही टीम इंडियाच्या या निर्णयावर टीका केली. 'अश्विनला बाहेर ठेवलं, यावर माझा विश्वास बसत नाही. तेदेखील स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर. ही टीम अविश्वसनीय आहे. तुम्ही तुमचे पाच सर्वोत्तम बॉलर निवडा, यामध्ये अश्विन पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायला पाहिजे. अश्विन आणि मोहम्मद शमीसारख्या बॉलरला बाहेर ठेवणं इच्छा मरणासारखं आहे. हे पाहून तुम्हाला हारायचंच आहे, असं वाटत आहे,' अशी बोचरी टीका थरूर यांनी केली.

रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) अश्विनऐवजी निवड करण्याचं विराटनेही कारण सांगितलं. इंग्लंडच्या टीममध्ये 4 डावखुरे बॅट्समन आहेत, त्यामुळे ऑफ स्टम्पबाहेरच्या फूटमार्कचा वापर जडेजा चांगल्या पद्धतीने करू शकतो, असा दावा विराट कोहलीने केला.

अश्विनने इंग्लंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 32 इनिंगमध्ये 32 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 814 रन केले आहेत. तर जडेजाने 19 इनिंगमध्ये 31.44 च्या सरासरीने 566 रन केले, यात 5 अर्धशतकं आहेत. ही आकडेवारी बघितली तर अश्विनची बॅटिंग जडेजापेक्षा चांगली असल्याचं दिसतं.

अश्विनने इंग्लंडमध्ये 6 टेस्टमध्ये 25.77 च्या सरासरीने 232 रन केले, तर 32.92 च्या सरासरीने त्याने 14 विकेट घेतल्या. 62 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दुसरीकडे जडेजाने इंग्लंडमध्ये 9 टेस्टमध्ये 29.21 च्या सरासरीने 409 रन केले आणि 48 च्या सरासरीने 18 विकेट घेतल्या.

First published:
top videos

    Tags: India vs england, R ashwin, Ravindra jadeja, Shashi tharoor, Virat kohli