नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या कसोटीमध्ये खातंही न उघडता बाद झाला. कसोटी करिअरमध्ये सध्या सर्वोत्तम क्रिकेटपटू असलेल्या विराटसाठी शून्यावर बाद होणं हे एखाद्या डागासारखंच असेल. आतापर्यंत विराट कोहली दहा वेळा कसोटीत शून्यावर बाद झाला आहे.बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यात कसोटी मालिकेत पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. गेल्या कसोटी सामन्यात द्विशतक करणाऱ्या विराट कोहलीकडून चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र विराट कोहली बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदच्या दुसऱ्याच चेंडूवर पायचित झाला. बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदनं पायचितचं अपिल केलं पण मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं. त्यानंतर यष्टीरक्षक लिंटन दास आणि गोलंदाजांनी कर्णधाराला डीआरएस घेण्याबाबत सांगितलं. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिल्यानंतर चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचं दिसताच कोहलीला बाद दिलं. बांगलादेशविरुद्ध कोणत्याही प्रकारात शून्यावर बाद होणारा विराट हा भारताचा फक्त दुसरा कर्णधार आहे. याआधी 2004 मध्ये सौरव गांगुली शून्यावर बाद झाला होता. भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नको असलेला विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनी 96 डावात 8 वेळा बाद झाला आहे तर मन्सूर अली खान पतौडी सात वेळा बाद झाले. विराटने कपिल देव यांच्याशी बरोबरी केली असून ते दोघेही 6 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. 2011 पासून कसोटी खेळणाऱा विराट कोहली आतापर्यंत 10 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यात दोन वर्षे अशी होती ज्यात तो शून्यावर बाद झाला नव्हता. 2015 आणि 2016 मध्ये तो एकदाही खातं न उघडता बाद झाला नव्हता. सप्टेंबरमध्ये विंडीजविरुद्ध कोहली शून्यावर बाद झाला होता. घरच्या मैदानावर खेळताना विराट आतापर्यंत तीनवेळा शून्यावर बाद झाला आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी कोलकात्यात झालेल्या लंकेविरुद्धच्या सामन्यात विराटला सुरंगा लकमलने बाद केलं होतं. दोन वर्षांनी त्याला खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं आहे. VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







