इंदौर, 02 मार्च : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा फिरकीपटूंनी फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनने दुसऱ्या डावातही 8 विकेट घेण्याची कामगिरीही केली. त्याने भारतीय संघाला अडचणीत आणलं आहे. तसंच भारताविरोधात त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. नाथन लायन भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू ठरला आहे. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला नाथन लायनने मागं टाकलं आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १०५ विकेट घेण्याचा विक्रम होता. आता नाथन लायनने ११२ विकेट घेतल्या आहेत. भारताच्या दुसऱ्या डावात नाथन लायनने शुभमन गिलची विकेट घेताच हा विक्रम त्याने नावावर केला. केएल राहुलनंतर विराटचा नंबर? गेल्या 15 डावात रनमशिनला ब्रेक तिसऱ्या कसोटी सामन्यात फक्त दुसऱ्याच डावात नाही तर नाथन लायनने पहिल्या डावातही तीन विकेट घेतल्या होत्या. त्याने चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि श्रीकर भारतला बाद केलं होतं. नाथन लायनने घेतलेल्या विकेटच्या जोरावर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने १०९ धावात गुंडाळलं. त्याच्याशिवाय मॅथ्यू कुह्नेमनने ५ विकेट घेतल्या होत्या. तर टॉड मर्फीच्या खात्यात एक विकेट होती. नाथन लायनने दुसऱ्या डावात २३.३ षटके गोलंदाजी टाकताना भारताचे ८ गडी बाद केले. यात विराट कोहली, श्रेयस अय्यर वगळता इतरांचा समावेश होता. रोहित, जडेजा, अश्विन यांना पायचित तर गिल, भरत, सिराजचा त्रिफळा उडवला. भारताकडून चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात सर्वाधिक ५९ धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.