दिल्ली, 18 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फक्त एका धावेची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २६३ धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेला भारतीय संघ २०० धावा तरी करेल का अशी शंका होती. मात्र अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी शतकी भागिदारी करत संघाला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण भारतीय संघाचा पहिला डाव २६२ धावात संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाला एका धावेची आघाडी मिळाली. भारताची अवस्था एकवेळ ४ बाद ६६ अशी होती. त्यानतंर जडेजा आणि कोहलीने अर्धशतकी भागिदारी केली. जडेजा, कोहली आणि एस भरत लागोपाठ बाद झाल्यानंतर भारताच्या ७ बाद १३९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी शतकी भागिदारी केली. हेही वाचा : कोहलीच्या विकेटवरून वाद? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, विराटची रिएक्शन व्हायरल अश्विन आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद २५३ धावा झाल्या होत्या. त्यानतंर अक्षर पटेल आणि मोहम्मद शमीही बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लायनने सर्वाधिक पाच बळी घेतले तर मॅथ्यू कुह्नेमन आणि टॉड मर्फीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ७४ धावा केल्या. त्याच्याखालोखाल विराट कोहलीने ४४ तर अश्विनने ३७ आणि रोहित शर्माने ३२ धावा केल्या. सलामीवीर केएल राहुल पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.