मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Olympic चा रोमांच आणखी वाढणार, क्रिकेटच्या समावेशासाठी ICC ची बॅटिंग!

Olympic चा रोमांच आणखी वाढणार, क्रिकेटच्या समावेशासाठी ICC ची बॅटिंग!

ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश होणार?

ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश होणार?

क्रिकेट रसिकांसाठी आयसीसीने (ICC) मंगळवारी आनंदाची बातमी दिली आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये (Olympic) समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आयसीसीने सांगितलं.

मुंबई, 10 ऑगस्ट : क्रिकेट रसिकांसाठी आयसीसीने (ICC) मंगळवारी आनंदाची बातमी दिली आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये (Olympic) समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आयसीसीने सांगितलं. 2028 लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Olympic 2028) क्रिकेटचा समावेश करणं आमचं लक्ष्य असल्याचं आयसीसीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे.

'भविष्यातल्या स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर आम्हाला आनंद आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असणं हे आमचं लक्ष्य आहे. जगभरात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत. यातल्या 90 टक्के लोकांना क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये असावं, असं वाटतं,' असं आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बारक्ले या प्रसिद्धी पत्रकात म्हणाले आहेत.

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी एक कार्यकारी गट बनवण्यात येणार आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे इयन व्हॉटमोर याचे अध्यक्ष असतील. आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष इंद्र नोयी, झिम्बाब्वे क्रिकेटचे प्रमुख तावेंग्वा मुकुहलानी, आशियाई क्रिकेट काऊन्सीलचे उपाध्यक्ष महिंदा वल्लीपुरम आणि युएसए क्रिकेटचे प्रमुख पराग मराठे यांचा या गटात समावेश आहे.

'दक्षिण आशियामध्ये क्रिकेटचे 92 टक्के चाहते आहेत. तर अमेरिकेतही 3 कोटींच्या आसपास ही संख्या आहे. या सगळ्यांना ऑलिम्पिक मेडलसाठी क्रिकेट टीमची स्पर्धा पाहणं रोमांचक असेल. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला, तर याच्यासारखी उत्कृष्ट गोष्ट कोणतीही नसेल, पण हे करणं सोपं नाही, कारण इतर अनेख खेळदेखील ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे,' असं आयसीसीने सांगितलं.

बीसीसीआयने (BCCI) 2028 ऑलिम्पिकसाठी पुरुष आणि महिला टीम पाठवण्याला एप्रिल महिन्यात परवानगी दिली, तेव्हापासून लॉस एन्जेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रस्ताव पाठवण्याचा आयसीसीचा मार्ग मोकळा झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पॉण्टिंग यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या आयसीसीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

बीसीसीआयने याआधी क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाला विरोध केला होता. आता बीसीसीआयचा विरोध मावळला आहे. लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठीची प्रक्रिया 2022 च्या मध्यात सुरू होईल. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) 2023 मध्ये याबाबतचा निर्णय घेईल.

First published:

Tags: Cricket, Olympic