मुंबई, 29 डिसेंबर : आयसीसीसने गुरुवारी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी नामांकन झालेल्या खेळाडुंची यादी जाहीर केली आहे. या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंचे नामांकन करण्यात आले असून यात एका भारतीयाचा समावेश आहे. तर उर्वरित तिघे हे झिम्बॉब्वे, इंग्लंड आणि पाकिस्तानचे आहेत. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याचं नाव यामध्ये असून त्याच्याशिवाय सिकंदर रजा, सॅम करन आणि मोहम्मद रिजवान यांचीही नावे यामध्ये आहेत. सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष जबरदस्त असं होतं. त्याने 31 सामन्यात 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा काढल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला असून असं करणारा तो एकमेव फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने यामध्ये एकूण 68 षटकार लगावले असून यादीतील इतर फलंदाजांच्या तुलनेत तो खूपच पुढे आहे. हेही वाचा : वर्षाअखेरीस टीम इंडियाला गूड न्यूज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा असा फायदा ऑस्ट्रेलियात यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने 6 सामन्यात 60 च्या सरासरीने धावा केल्या. तर स्ट्राइक रेटही जवळपास 190 चा होता. सूर्यकुमारने यामध्ये तीन अर्धशतकेही केली. २०२२ या वर्षात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनने टी20 वर्ल्ड कपमध्ये मालिकावीरचा बहुमान पटकावला. तर फायनलमध्ये तो सामनावीर ठरला होता. करनने वर्षभरात 19 सामन्यात 25 विकेट घेतल्या. यापैकी 13 विकेट या टी20 वर्ल्ड कपमध्ये घेतल्या होत्या. झिम्बॉब्वेचा सिकंदर रजा याच्यासाठीही 2022 हे वर्ष जबरदस्त असं होतं. त्याने 24 सामन्यात 735 धावांसह 25 विकेट घेण्याची कामगिरी केली. पहिल्यांदाच त्याला आयपीएलमध्येही संधी मिळाली. पंजाब किंग्जने त्याला मिनी ऑक्शनमध्ये खरेदी केलं. टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने सलग दुसऱ्या वर्षी जबरदस्त अशी कामगिरी केली. गेल्या वर्षी त्याने 1326 धावा केल्या होत्या. तर यंदा त्याने 996 धावा केल्या आहेत. केवळ 4 धावांमुळे सलग दुसऱ्या वर्षी 1 हजार धावा करण्याची कामगिरी हुकली. रिजवानने वर्षभरात तब्बल 10 अर्धशतके केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.