
ICC Cricket World Cup स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर विजय मिळवून 10 गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या स्थानी 9 गुणांसह न्यूझीलंड आहे. बांगलादेशचे 5 गुण झाले असून त्यांना पुढचे तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील तर ते सेमीफायनल गाठू शकतील.

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लडं तिसऱ्या स्थानी घसरले आहे. त्यांचे पाच सामन्यात 8 गुण झाले आहेत. तर भारत चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी सामने भारताचे झाले आहेत. भारताशिवाय इतर सर्व संघांचे पाचपेक्षा जास्त सामने झाले आहेत.

बांगलादेशने सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात एक जरी पराभव झाला तरी त्यांना सेमिफायनल गाठता येणार नाही. उरलेले तीनही सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना 'जर.. तर'च्या खेळावर अवलंबून रहावं लागेल.

अफगाणिस्तानचे पुढचे सामने भारत, बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध आहेत. पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध लढायचे आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.

गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर असलेल्या लंकेचे 5 सामन्यात 4 गुण झाले आहेत. तर सातव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजचे 5 सामन्यात 3 गुण, या संघांनाही वर्ल्ड कपमध्ये आव्हान जिवंत ठेवणं कठीण आहे. वेस्ट इंडिजचे पुढचे सामने न्यूझीलंड, भारत, अफगाणिस्तान आणि लंकेविरुद्ध आहेत.

अफगाणिस्तानचा पाचही सामन्यात पराभव झाला आहेत. तर पाकिस्तानने 5 सामन्यात 3 गुण आणि दक्षिण आफ्रिकेचे 6 सामन्यात 3 गुण झाले आहेत. या तीनही संघांचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.




