आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये दहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांनी दोन देशांकडून वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला आहे. यात एका खेळाडूने तर आपल्या देशाविरुद्ध खेळताना सामनावीरचा पुरस्कारही पटकावला होता.
अँडरसन कमिन्स 1992 मध्ये वेस्ट इंडिजकडून वर्ल्ड कप खेळला होता. त्यानंतर 15 वर्षांनी 2007 मध्ये त्याने कॅनडाच्या संघातून वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला. 1992 च्या वर्ल्डकपमध्ये 12 विकेट घेणाऱ्या या खेळाडूला कॅनडाकडून खेळताना फक्त 2 विकेट घेता आल्या.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एड जोएसनेसुद्धा दोन देशांकडून वर्ल्ड कप खेळला आहे. 2007 मध्ये तो इंग्लंडच्या संघात तर 2011 मध्ये आयर्लंडकडून खेळला होता.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सुद्धा वर्ल्ड कपमध्ये दोन देशांचे प्रतिनिधीत्व केलं आहे. 2007 मध्ये आयर्लंडकडून खेळणाऱ्या मॉर्गनने 2009 ला इंग्लंडकडून खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर मॉर्गनने 2011 आणि 2015 मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. आता तो चौथ्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहे.
1983 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या कॅपलर वेसेल्सने 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघातून खेळताना पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. यात त्याने 81 धावा करत सामनावीर पुरस्कारही पटकावला होता.