भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे 3 आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे लीग सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. जर तो वेळेच्या आधी तंदुरुस्त झाला तर शेवटच्या साखळी सामन्यात मैदानात उतरू शकतो.
धवन बाहेर झाल्याने त्याच्या जागी कोण खेळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळेल याची चर्चा सुरू आहे.
शिखर धवनला योग्य पर्याय रवींद्र जडेजा ठरू शकतो. कारण त्याने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध जडेजाने अर्धशतक केलं होतं.
जडेजा संघात आल्यास चौथ्या क्रमांकावर केदार जाधव, पाचव्या क्रमांकावर धोनी आणि त्यानंतर अनुक्रमे पांड्या आणि जडेजा फलंदाजीला येऊ शकतात.
भारतीय संघात सध्या चार गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. जडेजा संघात आला तर आणखी एक अनुभवी गोलंदाज मिळेल. एखाद्याची गोलंदाजी चालली नाही तर जडेजाचा उपयोग होऊ शकतो.
जडेजाला इंग्लंडच्या खेळपट्टीचा अनुभव आहे. 2013 च्या चॅम्पियन ट्रॉफीत विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याने 5 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या. तर फलंदाजी करताना 148 च्या स्ट्राइक रेटने 80 धावा केल्या होत्या.
फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय जडेजाचं क्षेत्ररक्षणही जबरदस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ग्लेन मॅक्सवेलचा अफलातून झेल टिपला होता. जडेजाच्या या उपयुक्ततेमुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यास धवनला योग्य पर्याय ठरेल.