नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेमधील (Asia Cup) दुसऱ्या सुपर फोर लढतीत टीम इंडियाला (India) पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आधी रविवारी (4 सप्टेंबर) पाकिस्तानकडून (Pakistan) पराभव झाल्यानंतर मंगळवारी (6 सप्टेंबर) श्रीलंकेनं (Sri Lanka) भारतीय संघाला 6 विकेट्सनी हरवलं. भारताचे सलग दोन पराभव झाले असून, श्रीलंकेने सलग तीन मॅचेसमध्ये जिंकण्याचा पराक्रम केलाय.
भारतानं दिलेलं 174 धावांचं लक्ष्य श्रीलंकेनं शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि फायनलमधील आपली जागा पक्की केली आहे. दरम्यान, दोन पराभवांनंतर भारत अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. तर, या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असं आहे. भारताला अजूनही फायनल गाठता येऊ शकते, पण ते इतकं सोपं नाहीये. भारतीय टीम फायनलमध्ये कशी पोहोचू शकते, या संदर्भात फर्स्ट पोस्टने वृत्त दिलंय.
सुपर 4 फॉरमॅट नेमका असतो कसा?
भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चार टीम सुपर 4 स्टेजसाठी पात्र ठरल्या आहेत. त्या चारही टीम एकदा एकमेकांविरोधात खेळतील, म्हणजेच या स्टेजमध्ये एकूण सहा मॅचेस खेळवल्या जातील.
फायनल टीम कशा निवडल्या जातील?
प्रत्येक वेळी जी टीम सुपर 4 मॅच जिंकते तिला 2 पॉइंट्स दिले जातील. त्यामुळे, सुपर 4 स्टेजनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिले आणि दुसरे स्थान मिळवणाऱ्या दोन टीम आशिया कप 2022 ची फायनल मॅच खेळतील.
आशिया कप 2022 सुपर 4 पॉइंट्स टेबलची सध्याची स्थिती काय?
मंगळवारी भारताविरुद्ध मॅच जिंकल्यानंतर श्रीलंकेने फायनलमधील त्यांची जागा जवळपास निश्चित केली आहे. श्रीलंका सध्या चार पॉइंट्स आणि 0.3512 NRRसह सुपर 4 पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान दोन पॉइंट्स आणि 0.126 NRRसह दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडिया इंडिया सध्या शून्य पॉइंट्स आणि -0.125 NRRसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तान शून्य पॉइंट्ससह -0.589 NRRसह चौथ्या क्रमांकावर आहे.
भारत फायनल कसा गाठू शकतो?
पाकिस्तान उर्वरित सुपर 4 सामने हरला तरच भारत फायनल गाठू शकतो. पाकिस्तानचे दोन सामने अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध होणार आहेत. तसंच भारताला नेट रन रेट सुधारण्यासाठी अफगाणिस्तानला (Afghanistan) मोठ्या फरकाने पराभूत करणं आवश्यक आहे. असं झाल्यास सुपर फोरमध्ये भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी एक पॉइंट असेल. याच समीकरणाने तिन्ही टीममधील ज्यांचा NRR जास्त असेल ते फायनलमध्ये पोहोचतील.
थोडक्यात सांगायचं झाल्यास अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केल्यास, भारताने अफगाणिस्तानचा पराभव केल्यास, श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केल्यास आणि भारताचा NRR अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपेक्षा जास्त असल्यास भारत फायनलमध्ये पोहोचू शकतो. पण त्यासाठी भारताला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.