Wimbledon Championship 2022: टेनिस जगतातील सगळ्यांत लोकप्रिय स्पर्धा विम्बल्डन नुकतीच पार पडली. मेन्स सिंगलमध्ये नोवाक जोकोविच ( Novak Djokovic) सातव्यांदा जगज्जेता ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसचा (Nick Kirgious) पराभव केला. जोकोविचनं ही स्पर्धा जिंकून विक्रम केला असला तरी जगभरात किर्गियोसची चर्चा सुरू आहे. दारू, ड्रग्जच्या आहारी गेलेला, डिप्रेशनचा सामना करणारा, आत्मविश्वास गमावलेला किर्गियोस विम्बल्डनच्या (Wimbledon) फायनलपर्यंत येऊन झुंजार खेळी खेळला. त्याच्या या प्रवासाबद्दल ‘ दी इंडियन एक्सप्रेस’ च्या वेबसाईटवर अधिक सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेकदा आत्महत्येचा विचार मनात आलेला टेनिसपटू निक किर्गियोसनं या सगळ्या नकारात्मतेवर प्रचंड प्रयत्नांनी मात केली आहे. “एक काळ असा होता की रोज रात्री मी एकटा 20-30 ड्रिंक्स घेत असे आणि दुसऱ्या दिवशी त्याच हँगओव्हरमध्ये मॅचेस खेळत असे. मला खूप एकटं वाटायचं, आयुष्य संपवण्याचे विचार मनात यायचे,” असं निक सांगतो. याच मनस्थितीतून जात असताना 2019 मधील स्पर्धेत त्यानं राफेल नदाल, झुरेव्ह यांचा पराभव केला. “किर्गियोस वाईट माणूस आहे असं मला वाटत नाही; पण प्रतिस्पर्धी खेळाडू, प्रेक्षक आणि स्वत: या तिघांबद्दलही त्याने आदर दाखवायला हवा. त्यानं त्यावर काम केलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नदालनंही मॅच जिंकल्यानंतर दिली होती. स्वत:बद्दलचा आदर आणि प्रेम हे किर्गियोससाठी त्यावेळेस सर्वांत महत्त्वाचे होते. “मला बेडमधून उठावंसं वाटायचं नाही, जगावंसं वाटायचं नाही. माझ्या आयुष्याचाही तिरस्कार वाटत होता. मी माझ्या कुटुंबाला, चांगल्या मित्रांना सगळ्यांना दूर लोटलं होतं. माझा कोणावरही विश्वास नव्हता,” असं त्यानं Turn up the Talk या पॉडकास्टशी बोलताना सांगितलं होतं. किर्गियोस कधीही जीवाचं बरंवाईट करून घेईल या भीतीनं त्याचा मित्र डॅनियलनं त्याच्या फोनवरचं लोकेशन सतत सुरु ठेवलं होतं . विम्बल्डनच्या वेळेस मात्र ही परिस्थिती अगदी पराकोटीला पोहोचली होती. एका नाईट आऊटनंतर किर्गियोस प्रचंड दारू पिऊन, ड्रग्ज (Alcohol and Drugs) घेऊन त्याच्या वडिलांना शोधत रुममध्ये आला. त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ते रडायला लागले. ते फक्त एवढंच म्हणाले, “निक, तू हे सगळं थांबवायला हवंस,” ‘त्या एका क्षणानंतर मी हे सगळं थांबवून पुन्हा नव्यानं सारंकाही सुरु करायचं ठरवलं,’ असं किर्गियोसनं सांगितलं. “माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटत होती. मी माझ्या मित्रांवर अवलंबून होतो. माझं वय फक्त 22-23 वर्षांचं होतं आणि मी मानसिक समस्यांना सामोरा जात होतो. मला काही बोलायचीही भीती वाटायची. माझ्या आईवडिलांचं माझ्यावर प्रेम आहे हे मला समजलं- मी ठीक होतो. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग परिस्थिती बदलायला सुरुवात झाली,” असा अनुभव निक सांगतो. “मी फक्त 24 वर्षांचा होतो आणि माझ्याकडे लाखो डॉलर्स होते, मी कुठेही राहू शकत होतो. तरीही माझी अवस्था दयनीय होती. मला फक्त माझ्या मनातलं सांगण्याएवढं सक्षम व्हायचं होतं. त्या काळात माझे आई आणि भावाशी संबंध चांगले नव्हते. त्यांच्याबरोबर असताना मला सतत टेन्शन असायचं. तो काळ अत्यंत वाईट होता, ” निकनं सांगितलं. अनेकदा निक घरात कपडे न घालताच फिरायचा, असं निकच्या आईनं एकदा राष्ट्रीय टेलिव्हिजनवर सांगितलं होतं. पण निकच्या आईचे काही अनुभव अगदी अंगावर काटा आणणारे होते. निकची मॅच होती आणि पहाटेचे 4 वाजले होते. निक कुठेही सापडत नव्हता. त्याच्या आईला खूप काळजी वाटत होती. “उद्या त्याला खेळायचंच आहे, तो कुठे आहे”? असं तिनं एजंट जॉन मॉरिसला विचारलं आणि त्याला शोधून आणायला पाठवलं. निक तेव्हा दारु पित होता. 2020 मध्ये निक दारू, ड्रग्ज आणि प्रचंड डिप्रेशनमध्ये होता. निक काहीही करू शकेल अशी सतत भीती त्याच्या आईला वाटत होती. तो लहान असताना त्याच्या आईला फिट यायच्या. आईची ती अवस्था त्याच्या मनात अगदी पक्की बसली होती. कोरोनाच्या महामारीत त्यानं काहीकाळ टेनिस बंद ठेवण्याचं कारण त्याच्या आईची तब्येत हेच होतं. निकला सगळ्या नकारात्मकतेतून बाहेर काढणं महत्त्वाचं होतं आणि कठीणही होतं. कारण त्याला वर्णद्वेषाचाही (Racism) सामना करावा लागला होता. “तुझी आई मूळ जिथून आली आहे तिथे तू परत जायला हवं,” असं ऑस्ट्रेलियाचे ऑलिंम्पिक स्विमिंग चँपियन आणि माजी राजकारणी डॉन फ्रेसर यांनी एकदा लाईव्ह असताना जाहीरपणे म्हटलं होतं. त्याच्या आईचा मलेशियामधील राजघराण्याशी संबंध आहे. निक 12 वर्षांचा असताना त्याची आई एका ऑस्ट्रेलियन टेनिस प्लेअरच्या प्रेमात पडली आणि तिनं ऑस्ट्रेलियाला यायचा निर्णय घेतला. पण 70 च्या त्या दशकात ऑस्ट्रेलियात वर्णद्वेष होताच आणि हे कायमचं स्थलांतर कठीण असणार आहे याची कल्पना त्याच्या आईला आली. निकच्या आजीबरोबर तो वाढला. ती त्याला ट्रेनिंगला घेऊन जात असे, त्याच्याकडे तिचं पूर्ण लक्ष असे. आजी गेल्यानंतर आपण एकाकी पडलो असं निकला वाटलं कारण आजी त्याची प्रेरणा होती असं तो म्हणतो. या वर्षीच्या सुरुवातीला त्यानं आपल्या आयुष्यातील या वाईट काळाबद्दलची एक पोस्ट टाकली होती. त्यानं स्वत:ला इजा करुन घेतल्याचा फोटोही त्याबरोबर होता. त्याचे नखरे, टेनिस रॅकेट्सची, खुर्च्यांची मोडतोड, प्रेक्षकांशी वाद घालणं अशा अनेक गोष्टी त्यानं टेनिस कोर्टवर केलेल्या सगळ्या जगानं पाहिल्या आहेत. मात्र, या सगळ्यावर त्यानं मात केली आहे. “एकदा का तुम्ही दारुच्या आहारी गेलात की तुम्हाला काहीही सुचत नाही. दारू आणि ड्रग्जच्या या विळख्यात तुम्ही पुरते अडकता.” पण आपल्या कुटुंबाचं आपल्यावर प्रेम आहे हे त्याला समजलं आणि तो बदलला. त्यानं आता वंचित मुलांसाठी एक संस्था काढली आहे. मानसिकदृष्ट्या तिथं तो बऱ्यापैकी गुंतलेला असतो. या काळात त्याच्या आयुष्यात आलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याला बरंच बोलतं केलं. अशा प्रकारच्या समस्या असणाऱ्यांना मदत करायला तिनं प्रवृत्त केलं, असं निक सांगतो. दारू, ड्रग्जच्या विळख्यात अडकलेला, स्वत्व गमावलेला हा ‘झोंबी’ रॉजर फेडरर, नदाल आणि जोकोविच या अव्वल टेनिसपटूंना आव्हान म्हणून उभा राहिला. त्यानं नदाल आणि जोकोविचचा दोनदा पराभव केला. “मला हरायला आवडत नाही. मी पराभव पचवू शकत नाही, ” असं एका मॅचनंतर निकनं सांगितलं होतं. तेच त्यानं आयुष्यातही करून दाखवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.