अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2023 मध्ये अंतिम सामना 28 मे रोजी होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना सोमवारी राखीव दिवशी खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सवर 5 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. चेन्नईविरुद्ध पराभवामुळे गुजरातचे सलग दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर गुजरातचे खेळाडू भावूक झाले होते. मोहित शर्माला अश्रू अनावर झाले होते. त्याला हार्दिक पांड्याने धीर दिला. हार्दिक पांड्याही पराभवानंतर नाराज दिसला. मात्र सामन्यानंतर बोलताना त्याने चेन्नई सुपर किंग्ज विजयाचे दावेदार होते असं म्हटलं. तसंच धोनीविरुद्ध पराभवाचं दु:ख नाही. हरायचं असेल तर त्याच्याविरुद्ध हरेन असंही पांड्या म्हणाला. ‘माझ्यासाठी ही वेळ योग्य’, IPLमधून निवृत्तीच्या चर्चेवर धोनीने दिली अशी प्रतिक्रिया एकवेळ अशी होती की सामन्यात गुजरात टायटन्सचे पारडे जड होते. मात्र शेवटच्या दोन चेंडूत रविंद्र जडेजाने सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला आणि गुजरातच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. अखेरच्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर मोहित शर्मा खेळपट्टीवर बसला. त्याच्या डोळ्यात पाणीही आलं. तेव्हा कर्णधार हार्दिक पांड्याने मोहित शर्माला धीर दिली आणि त्याचं सांत्वन केलं. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 214 धावा केल्या. साई सुदर्शनने फलंदाजीत कमाल करताना 97 धावा केल्या. त्याशिवाय वृद्धिमान साहाने अर्धशतक झळकावलं. यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या चेन्नईचा डाव पहिल्या षटकातच पावसामुळे थांबवावा लागला. शेवटी 15 षटकांचा खेळ आणि डकवर्थ लुईस निमायनुसार 171 धावांचे आव्हान चेन्नईला देण्यात आले. चांगली सुरुवात झाल्यानंतर चेन्नईने अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू आणि रविंद्र जडेजा यांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. अखेरच्या षटकात शेवटच्या दोन चेंडूवर चेन्नईला दहा धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार मारला तर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.